मुंबई : मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांचा जामीन आज मंजूर करण्यात आला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव तळोजा कारागृहात बंदिस्त होते. चौकशीकामी जाधव यांना जामीन देवू नये असा सरकारी पक्षाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सरकारी वकील आणि अविनाश जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांच्यात जोरदार युक्तीवाद न्यायालयात झाला.
कोविड दरम्यान काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कामावरुन का काढले याचा जाब अविनाश जाधव यांनी विचारला होता. याप्रकरणी अविनाश जाधव यांच्यावर कापूरबावडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे महापालिका कार्यालयासमोर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर काल 6 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र कापूरबावडी पोलिसांनी अतिवृष्टीचे कारण पुढे केले होते. या कारणास्तव पोलीसांचा अहवाल न्यायालयात सादर झाला नव्हता. मात्र आज झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांचा जामीन अर्ज मंजूर झाला.
जामीन अर्जावर सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांनी पोलिसांच्या वतीने जाधव यांच्या चौकशीसाठी अजून वेळ हवा असल्याची न्यायालयास विनंती केली. न्यायालयाने पोलिसांची विनंती फेटाळून लावली. सरकारी वकील आणि अविनाश जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांच्यात जाधव यांच्यावरील गुन्हयांसंदर्भात युक्तीवाद यावेळी झाला. जाधव यांना जामीन दिल्यास ते पुन्हा असे गुन्हे करण्याची शक्यता सरकारी वकिलांनी व्यक्त केली. मात्र अविनाश जाधव यांच्यावरील गुन्हे हे केवळ राजकीय स्वरुपातील गुन्हे असून इतर गंभीर गुन्हे नसल्याचे अॅड. राजूरकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अखेर अविनाश जाधव यांना जामीन मंजूर झाला.