मसल पॉवरच्या जोरावर रहीम गाजवायचा दरारा!- चाकूच्या घावात मित्रांनी तोडली त्याची जीवनधारा

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क):  जहा चार यार मिल जाये ….वही रात हो गुलजार…….असे म्हणत मनोज, विलास, पवन आणि रहिम हे चौघे मित्र मद्यपान करण्यासाठी अधुनमधून बैठक बोलावत असत. मद्यपानासाठी बैठक जमली म्हणजे चौघे जण एकमेकांचे उणेदुणे काढत असत. दुस-या दिवशी सुर्यदर्शन झाल्यानंतर चौघांची रात्रीची दारु सकाळी बॅटरीचे सेल उतरतात त्याप्रमाणे उतरुन जात असे. सकाळी शुद्धीवर आल्यावर चौघे सुतासारखे सरळ होत आपापल्या कामाला लागत असत. अशा प्रकारे मद्याच्या संगतीने चौघांची जीवनयात्रा हसतखेळत सुरु होती.

मनोज जुलाल गायकवाड, विलास तुकाराम निकम, पवन किसन लाडे आणि रहिम शहा मोहमंद शहा उर्फ रमा हे चौघे मित्र गेंदालाल मिल परिसरात रहात होते. चौघांची घरे जवळपास होती. दररोज चौघांचे चेहरे एकमेकांना दिसत असत. रोज दिसे अन् कपाळी बसे अशी चौघांची गत होती. तुझे माझे जमेना अन् तुझ्यावाचून करमेना अशी देखील चौघांची गत झाली होती. चौघे मित्र एकत्र जमले म्हणजे त्यांचा मद्यपानाचा कार्यक्रम ठरत असे.

मनोज, विलास आणि पवन हे तिघे मित्र समविचारी पक्षाचे होते. मात्र त्यांच्यातील मोहंमद शहा उर्फ रमा हा थोडा विचीत्र होता. तो तिघांच्या विरुद्ध दिशेने चालणारा होता. तिघांवर तो जणू काही जुलमी पद्धतीने राज्य करत होता. त्याला मद्यपान करण्याची ज्यावेळी आठवण येत असे त्यावेळी तो तिघांचे खिसे बळजबरीने चाचपडून बघत असे. ज्याच्या खिशात पैसे असतील ते पैसे घेऊन तो त्याची मद्यपानाची हौस पुर्ण करुन घेत असे. त्याच्या या चुकीच्या वागण्याला आणि सवयीला तिघे मित्र वैतागले होते. मात्र त्याच्या एकट्याच्या जुलमी राजवटीपुढे तिघांचे फारसे काही चालत नव्हते. तो तिघांवर हिटलरशाही चालवत होता. हम करे सो कायदा असे त्याचे वागणे होते. मसल पॉवरच्या बळावर तो आपली हुकुमशाही तिघांवर चालवून घेत होता. मसल पॉवर हेच त्याचे अस्त्र आणि शस्त्र होते. त्याची बुद्धी कमी असली तरी मसल पॉवरच्या बळावर आपण जग जिंकू शकतो अशी त्याला गुर्मी चढली होती.

आपल्याजवळ मनी पॉवर नसली तरी मसल पॉवर विरुद्ध माईंड पॉवर वापरण्याचे मनोज, विलास आणि पवन या तिघा मित्रांनी एकत्र आल्यावर ठरवले. तिघांनी आपली बुद्धी वापरुन त्याचा विक पॉईंट अर्थात कमजोरी असलेल्या दारुनेच त्याचा काटा काढण्याचे मनाशी ठरवले. शाहू नगर परिसरातील जळकी मिल परिसर हा निर्मनुष्य परिसर त्यांचा दारु पिण्यासाठी बसण्याचा अड्डा होता.

श्रीमंत लोक बिअर बार मधे चार भिंतीच्या आड बसून सिटींग चार्ज देवून आपली मद्यपानाची हौस पुर्ण करतात. मात्र गोरगरीब लोक कोणत्याही आडोशाला बसून मोफत सिटींग चार्जमधे मद्यपानाची हौस पुर्ण करत असतात. शाहू नगर परिसरातील निर्मनुष्य जळकी मिल परिसर म्हणजे गोर गरिबांची दारु पिण्याची विनामुल्य जागा म्हणून कुप्रसिद्ध झाला आहे. या निर्मनुष्य जागेवर रात्रीच्या वेळी अनैतिक कार्यक्रम देखील सुरु असतात असे म्हटले जाते.

chandrakant Gavali Addl SP

मनोज, विलास व पवन या तिघा समविचारी मित्रांनी एकत्र येत रहिमचा गेम करण्याचे ठरवले होते. या निर्णयाचा भाग म्हणून त्याला 20 जुलै रोजी दुपारच्या वेळी मद्यपान करण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. मद्यपान करण्यासाठी कोणतीही कटकट न करता बोलावणे आल्याचे बघून रहिम मनातून सुखावला. त्याच्या मनाची कळी खुलली. त्याने कुठलेही कारण न सांगता मद्यपानाच्या आमंत्रणाचा स्विकार केला. वाघाला पिंज-यात पकडण्यासाठी अगोदर एखाद्या बकरीला त्या पिंज-यात ठेवावे लागते. त्याप्रमाणे दारुचा लोभ दाखवून या हिटलर रुपी रहीमला मृत्यूच्या पिंज-यात अडकवण्यासाठी युक्ती वापरली जात होती.

ठरल्याप्रमाणे तिघे मित्र दुपारीच एकत्र जमले. त्यांनी बोलावल्याप्रमाणे रहिम त्यांच्याजवळ आला. चौघे जण दारु घेण्यासाठी दुकानावर सोबत गेले. दारु घेतल्यानंतर चौघे जण जळकी मिल परिसरातील रेल्वे रुळानजीक निर्मनुष्य जागेवर गेले. मद्यपानासाठी बसल्यानंतर सुरुवातीला काही वेळ चांगला गेला. मात्र नेहमीप्रमाणे नाव रहिम असले तरी रहिमने आपली हिटलरशाही तिघा मित्रांवर सुरु केली. जुना वाद उकरुन काढत त्याने तिघांसोबत भांडण सुरु केले. हा वाद होणार आहे अशी मानसिकता करुनच तिघे समविचारी मित्र रहिमला घेऊन आले होते. रहिमची नशा चढत गेली तसा त्याचा वाद देखील वाढत गेला. तो मद्याच्या नशेत असल्याचे बघून मनोज आणि विलास या दोघांनी जवळच पडलेल्या विटा उचलून रहिमच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली. विटांचा मार डोक्यावर बसल्यामुळे मद्याच्या नशेतील रहिम जखमी झाला. नेहमी बळाच्या जोरावर दादागिरी आणि हिटलरशाही करणारा रहिम आता कमजोर झाला होता. त्याची प्रतिकारशक्ती कमी झाल्याचे बघून पवन लाडे याने त्याच्यावर चाकूने वार केला. चाकूचा घाव वर्मी बसताच रहिम जमीनीवर कोसळला. जमीनीवर कोसळलेला रहिम आता वाचणार नाही असे लक्षात येताच तिघांनी त्याला जवळच्या गटारीत फेकून देत घटनास्थळावरुन पलायन केले. काही वेळातच रहिमने या जगाचा निरोप गटारीतच घेतला. नियतीने त्याचे मरण गटारीतच लिहून ठेवले होते.

घटनेनंतर काही वेळाने एका वृद्ध सुरक्षा रक्षकाचे गटारीत पडलेल्या रहिमकडे लक्ष गेले. रहिम त्या वृद्ध सुरक्षा रक्षकासाठी अनोळखी होता. त्या सुरक्षा रक्षकाने या घटनेची माहिती जळगाव शहर पोलिस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड, स.पो.नि. संदीप परदेशी, पोलिस उप निरीक्षक अरुण सोनार. पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलिस उप निरीक्षक एस.आर. क्षिरसागर व पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी तसेच सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता हे देखील आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील नाल्यात पालथ्या अवस्थेत रहिम शहा पडलेला होता. त्याला बाहेर काढण्यात आले. रहिम शहा हा सर्वांच्या दृष्टीने अनोळखी होता. त्याच्या अंगावर रक्ताचे डाग पडलेले होते. त्याची हत्या झाल्याचे उघडपणे दिसत होते. तातडीने सरकारी पंच आणि फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी बोलावण्यात आले. घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. काही वेळातच या घटनेची माहिती परिसरात वा-यासारखी पसरली. दरम्यान मयताची ओळख पटण्यास वेळ लागला नाही. उपस्थित लोकांनी मयताला ओळखले होते. काही वेळातच त्याची  पत्नी व  नातेवाईक देखील घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीकामी सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्तात त्याचा दफनविधी उरकण्यात आला. मयत रहिम शहा याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला अज्ञात मारेक-यांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 225/22 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला.

दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यासह पो.कॉ. तेजस मराठे व  तपास पथकाने समांतर पातळीवर खब-यांकडून माहिती घेत रहिमच्या मारेक-यांचा शोध सुरु केला होता. तांत्रिक मदत देखील घेतली वेळोवेळी घेतली जात होती. गेंदालाल मिल परिसरात राहणारे मयताचे तिघे मित्र घटनास्थळावर सोबत मद्यपान करत होते अशी माहिती पोलिसांना समजली. सीसीटीव्हीत देखील मयतासोबत त्याचे तिघे मित्र कैद झाले. घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या दिड तासातच शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दुपारी साडे चार वाजता बिग बाजार परिसरातून तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात यश मिळवले. स.पो.नि. संदीप परदेशी यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने संशयित पळून जाण्याच्या तयारीत असतांनाच त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या ताब्यातील पवन उर्फ देव किसन लाडे (19), मनोज जुलाल गायकवाड (42) व विलास तुकाराम निकम (34), सर्व रा. गेंदालाल मिल यांची चौकशी करण्यात आली. तिघांना  सुरुवातीला वेगवेगळ्या स्वरुपात व नंतर एकत्रीतपणे बोलावून गरजेनुसार योग्य त्या प्रमाणात पोलिसी खाक्या दाखवत विचारणा करण्यात आली. तिघांनी आपला गुन्हा कबुल केला.       

जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, पोलिस उप निरीक्षक अरुण सोनार, पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलिस उप निरीक्षक एस. आर. क्षीरसागर यांच्यासह हे.कॉ. विजय निकुंभ, पोलिस नाईक प्रफुल धांडे, पो.कॉ. तेजस मराठे, रतन गिते, योगेश इंधाटे, योगेश पाटील, उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.  या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करत आहेत. आरोपींच्या शोधकामी स.पो.नि. संदीप परदेशी आणि  पो.कॉ. तेजस मराठे यांनी अथक परिश्रम घेतले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here