अल्पवयीन मुलीवर अत्याचार – आरोपीस जन्मठेप

अकोला : मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील २२ वर्षी युवक आकाश सोळंके याला प्रेम संबंधातून अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याप्रकरणी पोस्को कायद्या अंतर्गत दोषी ठरवून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व दीड लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

आरोपी आकाश सोळंके याने सोळा वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष देवून तिच्याशी प्रेम संबंध जोडून तिच्यावर अत्याचार केले. त्यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहीली. या मुलीने मूर्तिजापूर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीच्या आधारे १९ नोव्हेंबर २०१६ रोजी पोस्को व भांदवीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली. ती शासकीय स्‍त्री रुग्णालयात उपचार घेत असताना तिची प्रसुती होऊन तिने मुलाला जन्म दिला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंग सोळंके यांनी केला.

न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे गुन्हा सिद्ध करण्यासाठी सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने साक्षीपुरावे ग्राह्य धरून आकाश सोळंकेला भांदवी ३७६ (२) (३) मध्ये जन्मठेपेचे शिक्षा व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास, पोस्को कलम चारमध्ये जन्मठेप व ५० हजार रुपये व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास, पोस्के कलम पाच (१)मध्ये जन्मठेप व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. आजन्म कारावास व दीड लाख दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली असून, सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. सरकार पक्षाची बाजू सहायक सरकारी वकील किरण खोत यांनी मांडली. पैरवी अधिकार म्हणून पीएसआय प्रवीण पाटील व नारायण शिंदे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here