उड्डाणपुल सुरु करण्यासाठी जनतेचा सुटला धीर!– ठेकेदाराचा मनमानी कारभार खरच किती बधीर?

जळगाव : वारंवार मुदतवाढ मागून चालढकल करणा-या कंत्राटदाराच्या कामाला वैतागून अखेर माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या पुढाकाराने आहे त्या अवस्थेत उड्डाणपुलाचे बॅरिकेट्स काढून जळगावचा शिवाजीनगर पुल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. प्रशासनाकडून कंत्राटदारास वारंवार दिली जाणारी मुदतवाढ आणि ठेकेदाराकडून लवकरच पुल सुरु करण्याचे दिले जाणारे आश्वासन यामुळे या पुलाचे काम चांगलेच रेंगाळले होते. गेल्या साडेतीन वर्षापासून सुरु असलेले उड्डाणपुलाचे काम मुदत संपून देखील पुर्ण होण्याचे नाव घेत नव्हते. अखेर माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी आज 6 ऑगस्ट 2022 रोजी पुल गाठून बॅरिकेट्सला बांधलेल्या तारा पिंचीसने तोडून या पुलाचे लोकार्पन केले. जनतेचा प्रक्षोभ उसळल्यानंतर काय होते याचे हे एक उदाहरण आहे.  

जळगाव शहरातून जाणा-या रेल्वे लाईनवर शिवाजीनगर आणि शहराला जोडणारा ब्रिटीश कालीन उड्डाणपुल जीर्ण झाला होता. त्यामुळे तो पुल तोडून त्या जागी नव्या उड्डाण पुलाची निर्मीती करण्याचे काम सुरु करण्यात आले. जळगाव शहरासह जळगाव तालुका, यावल तालुका व  चोपडा तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने हा पुल अतिशय महत्वाचा आहे. मात्र हे काम पुर्ण करण्यासाठी कंत्राटदार एजन्सीने लावलेल्या विलंबामुळे जळगावकर जनतेच्या सहनशिलतेचा जणूकाही अंत पाहिला जात होता. सामाजिक तथा  माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचा याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. या कामासाठी कंत्राटदार एजन्सीने तब्बल साडेतीन वर्षाचा कालावधी लावला. वारंवार विविध कारणे दाखवून मुदतवाढ मागणा-या कंत्राटदाराला प्रशासनाकडून देखील मुदतवाढ दिली जात होती. याचाच पुरेपुर फायदा कंत्राटदाराने घेतल्याचे दिसून आले आहे. पुल सुरु होत नसल्यामुळे वेळोवेळी जनतेचा सुटत असलेला संयम लक्षात घेत स्वत: जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मक्तेदारास काम वेळेत पुर्ण करण्याचे वेळोवेळी आदेश दिले. मात्र कधी कोरोनाचे कारण, कधी मजुर नसल्याचे कारण, कधी रेती नसल्याचे कारण तर कधी डांबर नसल्याचे कारण पुढे करुन ठेकेदार मुदतवाढ मिळवून घेत होता.

सप्टेबर 2020 पर्यंत पुलाचे काम पुर्ण होण्याची मुदत होती. मात्र कोरोनाचे कारण पुढे करत काम थांबल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मार्च 2021 पर्यंत पुलाचे काम पुर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र पुलालगत असलेले विजेचे खांब स्थलांतरीत न करण्यात आल्याने काम थांबल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आले. त्यानंतर डिसेंबर 2021 चा जिल्हाधिका-यांनी ठेकेदारास अल्टीमेटम दिला. मात्र वाळू मिळत नसल्याचे कारण पुढे करत पुन्हा ठेकेदाराने मुदतवाढ मागीतली आणि प्रशासनाने ती दिली. आपण मागितलेली मुदतवाढ येनकेन प्रकारे सेटल होत असल्याचे ठेकेदाराच्या लक्षात आले होते. त्यानंतर मार्च 2022 पर्यंत पुल सुरु होण्याची अपेक्षा जनता बाळगून होती. मात्र पुलासाठी लागणारा निधी थांबवण्यात आल्याचे कारण पुढे करण्यात आले. त्यानंतर 1 जुन 2022 रोजी पुलाचे काम पुर्ण होणार असल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आले. मात्र अमृत योजनेच्या कामामुळे पुलाच्या कामावर परिणाम होत असल्याचे कारण यावेळी ठेकेदाराकडून पुढे करण्यात आले. त्यानंतर 15 जुलै पर्यंत पुल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आले. मात्र पावसामुळे डांबरीकरण होत नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसात काम पुर्ण होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर एक दिवसात पुल सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले. तो एक दिवस कधी उजाडणार हे कुणी बोलायला तयार नव्हते.

अखेर आज 6 ऑगस्ट 2022 रोजी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी तसेच सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता राऊत यांच्याशी संपर्क साधला. प्रशासनाकडून पुल सुरु होत नसल्यास आपणच पुल सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दीपककुमार गुप्ता यांच्यासह वाहनधारक तसेच जनतेने रस्त्यावर उतरुन आहे त्या अवस्थेत हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्याचा विडा उचलला. नारळ फोडून सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी हातातील कटरने रस्त्यात ठेवलेल्या बॅरिकेट्सच्या तारा तोडून ते हटवले. त्यानंतर पुल वाहतुकीसाठी खुला झाला. मंत्री महोदयांच्या हातून कात्रीने फित कापून पुलाचे उद्घाटन होण्याची वाट बघण्यास शिवाजीनगर परिसरातील जनतेला सारस्य नसल्याची यावेळी चर्चा सुरु होती. त्यापुर्वीच कटरने तारा कापून बॅरिकेट्स हटवून गुप्ता यांनी हा पुल सुरु केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here