धावत्या ट्रेनमधून दागिने लांबवणा-या टोळीतील तिघांना अटक

जळगाव : धावत्या ट्रेन मधून दागिन्यांची बॅग लांबवणा-या गुन्हेगारांना मदत करणा-या तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अटक केली असून त्यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यापुर्वी सतवीरसिंग बलवंतसिंग टाक (तांबापुरा जळगाव) याला यापुर्वीच धावत्या ट्रेन मधून आरपीएफ व प्रवाशांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. अटकेतील गुन्हेगारांची संख्या एकुण चार झाली असून दागिने घेवून पलायन करणारा मुख्य आरोपी फरार आहे. पोलिस पथक त्याच्या मागावर आहे. अटकेतील तिघांकडून 14 लाख 7 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हरिश्चंद्र खंडू वरखेडे हे 64 वर्ष वयाचे जेष्ठ नागरिक दरमहा अवघ्या पाच हजार रुपये पगारावर गेल्या तिस वर्षापासून कुरियर डीलीव्हरीचे काम करतात. सोन्याचे दागिने व्यापा-यांना मुंबई येथे पोहोचवण्याचे काम त्यांच्याकडे असते. जेष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांना रेल्वेत लोअर बर्थ मिळतो. ज्या दिवशी तिकीट कन्फर्म असेल त्याच दिवशी ते मालाची डीलीवरी करण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात.

7 ऑगस्ट रोजी रात्री हावडा मुंबई मेल या ट्रेनचे त्यांचे मुंबईला जाण्यासाठी रिझर्वेशन होते. मात्र गाडीला उशीर झाल्यामुळे ती 8 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेनंतर जळगाव रेल्वे स्टेशनवर आली. प्रवासात पाचोरा ते चाळीसगाव दरम्यान खिडकी बंद करण्याच्या बहाण्याने त्यांच्या ताब्यातील बॅग दोघा चोरट्यांनी शिताफीने लांबवली. त्या बॅगेत 21 लाख 91 हजार रुपये किमतीचे 422.81 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 52 हजार 400 रुपये रोख रक्कम होती.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड सुरु केली. दरम्यान प्रवाशांसह आरपीएफच्या मदतीने सतवीरसिंग टाक (तांबापुरा – जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. मात्र बॅगेतील रक्कम व दागिने काढून घेत त्याचा साथीदार रहिम उर्फ बावल्या रशीद खान (तांबापुरा – जळगाव) हा गाडी हळू झाल्यानंतर फरार होण्यात यशस्वी झाला. या गुन्ह्यातील दोघे संशयीत आरोपी हे एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत राहणारे असल्यामुळे एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध सुरु होता.

तपासादरम्यान धावत्या ट्रेनमधे आरोपींना मदत करणा-या तिघांना जळगाव शहरातील शिरसोली नाका परिसरातून अटक करण्यात आली. पोलीस उप-निरीक्षक दीपक जगदाळे, किशोर पाटील, छगन तायडे व अश्विनी इंगळे यांनी तिघा संशयीत आरोपींना ताब्यात घेत भुसावळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. अनिल रमेश चौधरी (रा. अयोध्या नगर जळगाव), भावना जवाहरलाल लोढा(अयोध्या नगर जळगाव) व तनिष्का भावना लोढा (अयोध्या नगर जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 19 तोळे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल (14 लाख 7 हजार 300 रुपये किमतीचा) हस्तगत करण्यात आला आहे. यातील मुख्य फरार आरोपी रहिम उर्फ बावल्या रशीद खान (तांबापुरा – जळगाव) याचा शोध सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here