नन्ना करते मान, अवघे पाऊणशे वयमान——- मोफत एसटीची दहीहंडी आहे छान छान!!

नवतीची नवलाई नऊ दिवस. न कर्त्याचा वार शनिवार. या काही म्हणी आज आठवल्या. नव्या शिंदेशाही सरकारने 75 वर्षीय वयोवृद्धांना मोफत एसटी प्रवास घोषित केल्याचे बघून आणी ऐकून हे सारं आठवलं. आणखी ही म्हण बघा, लबाडाचे आमंत्रण जेवल्यावर खरं. या सगळ्यांचा अर्थ हाच दिसतो की जेव्हा कुणाला काहीच द्यायचं नसतं तेव्हा काहीतरी देत असल्याच मृगजळ मात्र उभं केलं जातं. शिंदेशाही सरकारने नुकतीच घोषित केलेली 75 वर्षाच्या वृद्धांना मोफत एसटी प्रवासाची योजना जवळपास तशीच दिसते. सरकारी नोकरांना 58 व्या वर्षी सेवानिवृत्त केले जाते. या वयापर्यंत त्यांची एनर्जी टिकते, उपयोगाची असल्याची सरकारला वाटते.

जुन्या काळी आपल्या मुलींना आयुष्यभर भरपूर खायला मिळावं या आशेने गरीब, दरिद्री आईबाप 75 वर्षीय वृद्धांशीही तिचं लग्न लावून देत असत. त्या सामाजिक कुप्रथेची कुचेष्टा करताना तत्कालीन विद्वानांनी लिहिलंय, “दताजीचे ठाणे उठले – नन्ना करते मान – अवघे पाऊणशे वयमान” (म्हणजे नवरा मुलगा असा की त्याचे सर्व दात पडले, कवळी बसवली – त्याची मान सारखी हलते, वयमान फक्त 75 वर्ष आहे). शालजोडीतून जबरदस्त जोडे हाणण्याचा हा प्रकार आहे.

तसाच प्रकार 75 वर्षीय वृद्धांना मोफत एसटी प्रवासाची “दही – हंडी” फोडा म्हणून सांगण्याचा प्रकार दिसतो. आपल्या भारतीय धकाधकीच्या जीवनसंघर्षात हायब्रीड अन्नधान्य खाव लागतं. साठी बुद्धी नाठी म्हटली जाते. साठ वयोमानानंतर अनेकांची औषध सुरु होतात. अनेकांना मधुमेह, रक्तदाब, स्ट्रेस सुरु होतो. अनेक विमा कंपन्या एक कोटीची हॉस्पिटल विमा पॉलिसी विकताहेत. तुमचा हॉस्पिटल खर्च भागवून घरापर्यंत आणून सोडू अशी प्रलोभनं फायद्याचा व्यवहार म्हणून दाखवली जात आहेत. हार्ट सर्जरी, अ‍ॅंजीओप्लास्टी, अ‍ॅंजीओग्राफी, गुडघेदुखीने त्रस्त पिडीतांचे गुडघे फोडून तेथे अत्याधुनीक रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांची दुकानदारी जोरात आहे. ही एक सेवा आहे, मात्र ती विकत घ्यावी लागते.

अशा प्रकारे 60 ते 65 वयोमानात ज्यांचे गुडघे फुटले, जायबंदी झाले, चालण्यासाठी वॉकर, पाश्चिमात्य पद्धतीची शौचालये वापरणारे वयोवृद्ध रस्त्यांची चाळण झालेल्या खड्डेयुक्त रस्त्यावरुन एसटीने प्रवास करु शकतील का? ते एसटीच्या पाय-या चढू उतरु शकतील का? नाही…नाही..”तेव्हा राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला” असली चलाखी करण्यात काही अर्थ नाही.

75 वर्षाच्या वृद्धांना मोफत एसटी हा त्यांना दहीहंडीच्या स्पर्धेत उंचावर जावून “जिंका” म्हणून सांगण्याचा चेष्टेचा विषय दिसतो. काही देऊ नका पण चेष्टा थांबवा असेच वयोवृद्ध म्हणत असतील. “गेंड्याच्या कातडीच सरकार” असे म्हटल जात. या सरकारची कातडी संवेदनशील असेल तर या निर्णयाचा “क्रूर विनोद” निश्चीत थांबवेल अशी आशा करुया. 60 वर्षावरील सर्वांना मोफत एसटी सेवा द्याल काय? बोला आहे काही उत्तर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here