वाळू व्यवसायात भावेशला दिसले समृद्धीचे कुरण– चॉपर हल्ल्यात दोघांनी दिले त्याला जीवघेणे मरण 

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : भुषण रघुनाथ सपकाळे हा बारावी पास तरुण जळगाव नजीक खेडीखुर्द या गावचा रहिवासी आहे. धन आणि धान्य अशी समृद्धी लाभलेल्या भुषणच्या ताब्यात दोन डंपर, एक ट्रॅक्टर, एक बुलेट, दोन मोटार सायकल आणि एक अ‍ॅक्टीव्हा अशा वाहनांचा ताफा आहे. या सर्व वाहनांपैकी केवळ अ‍ॅक्टीव्हा ही दुचाकी त्याच्या नावावर असून इतर सर्व अवजड वाहने त्याच्या मित्रांच्या नावे आहेत. सहा एकर शेतीतून येणारे कपाशीचे उत्पन्न, रेती वाहतूक आणि बांधकाम व्यवसाय अशा विविध उत्पन्नाच्या स्त्रोतातून त्याचा आणि त्याच्या परिवाराचा घरखर्च चालतो.

दिवस उजाडला आणि मावळला तरी वाळू व्यवसायातून धनलक्ष्मीचा उगम होत असतो असे म्हटले जाते. माता धनलक्ष्मीची असिम कृपा भुषण सोबत कायम होती. वाहनांचे इंधन आणि घसारा, चालकांचा पगार, इतर सर्व प्रकारच्या धनराशीचे वितरण असा सर्व अफाट खर्च वजा जाता एखाद्या बड्या अधिका-याला मिळणा-या वेतनाइतकी धनराशी त्याला मिळत होती असे म्हणतात.

भुषण सपकाळे याचा एक मित्र होता. भावेश उत्तम पाटील असे भुषणच्या त्या मित्राचे नाव होते. आव्हाणे येथील मुळ रहिवासी असलेला भावेश सध्या जळगावला निवृत्ती नगरात राहण्यास आला होता. भावेश हा पुर्वी भुषणच्या वाळूच्या डंपरवर चालक म्हणून कामाला होता. सन 2012  पासून भुषण सपकाळे आणि भावेश पाटील हे दोघे मित्र होते. दोघांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे असायचे. दोघे मित्र सोबतच कित्येकदा ओल्या आणि मांसाहारी पार्टीत सहभागी होत असत. वाळू व्यवसायातून येणारा धनराशीचा ओघ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नेहमी पार्टी साजरी करणे भुषण यास महाग नव्हते.

कालांतराने भावेशची महत्वाकांक्षा वाढली. आपणही वाळू व्यवसायात सम्राट व्हावे अशी मनिषा त्याने बाळगली. त्या दृष्टीने त्याने हालचाली सुरु केल्या. तिन वर्षापुर्वी भावेशने आव्हाणे या गावी असलेली त्याच्या मालकीची एक एकर शेती वाळू व्यावसायीक रावसाहेब चौधरी याचे वडील गोपाल चौधरी यांच्या नावे 15 लाख रुपयात गहाण ठेवली होती असे समजते. त्यातून रावसाहेब आणि भावेश या दोघांमधे जवळीक वाढली होती. या जमीनीच्या उता-यावर रावसाहेब याचे वडील गोपाळ चौधरी यांचे नाव लागल्याचे देखील म्हटले जाते. भावेशकडे असलेला जुना डंपर त्याने सात महिन्यापुर्वी भंगारात विकला. त्यातून त्याला सुमारे तिन लाख रुपये मिळाले होते. त्या रकमेतून भावेशने त्याच्या एका मित्राच्या नावे एक जुना ट्रॅक्टर विकत घेतला. त्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून आता भावेश वाळू वाहतुक करु लागला.

भुषण सपकाळे आणि भावेश पाटील हे कधीकाळी चांगले मित्र होते. दोघे सोबत मद्यपान करण्यास बसत होते. मात्र आता स्वत:च वाळू व्यावसायिक झालेला भावेश रावसाहेब पाटील या वाळू व्यावसायीकाच्या जवळ आला होता. रावसाहेब हा देखील वाळू व्यावसायीक होता. रावसाहेब आणि भुषण या दोघा सम व्यावसायिकांचे पटत नव्हते. दोघांमधे व्यावसायिक वाद वाढले होते. सहा महिन्यापुर्वी दोघातील वाद शिगेला पेटला होता. आपला मित्र भावेश हा रावसाहेबकडे ओढला गेल्याने भुषण मनातून दुखी: झाला होता. आपली वाळूची वाहने पोलिसांना टीप देवून भावेश पकडून देत असल्याचा भुषण यास संशय होता. शिवाय तो स्वत:च वाळू व्यावसायिक झाला असल्याने त्याची प्रगती देखील भुषणच्या लक्षात आली होती. भुषण आणि रावसाहेब यांच्यातील वाद रावसाहेब याचे वडील गोपाल चौधरी यांनी कसाबसा मिटवला होता.  

भुषण विरुद्ध जळगाव शहर, जिल्हापेठ आणि जळगाव तालुका या पोलिस स्टेशनला विविध कलमाखाली गुन्हे दाखल आहेत. पुर्वी आपल्याकडे कामाला असलेला मित्र भावेश आता रावसाहेबसोबत रहात असल्याचे भुषणला आवडत नव्हते. रावसाहेब हा आपल्याबद्दल चुकीची माहिती भावेशला सांगत असावा अशी शंका भुषण यास येत होती. आपल्या आणि भावेशच्या मैत्रीत फुट पाडण्याचा रावसाहेब प्रयत्न करत असल्याचा संशय भुषणला येत होता. आपला आणि भुषणचा वाद आपल्याच वडीलांनी सामोपचाराने मिटवल्याचा मुद्दा रावसाहेब यास कमीपणाचा वाटत होता.

23 ऑगस्ट रोजी सायंकाळी भुषण आणी त्याचा डंपर चालक मनिष पाटील असे दोघे आव्हाणे या गावी नदीजवळ डबा डबा रमी पत्ता खेळत बसले होते. त्यावेळी सायंकाळी साडे सहा वाजता भुषणच्या मोबाईलवर भावेश पाटील याचा कॉल आला. पलीकडून भावेशच्या मोबाईलवरुन रावसाहेब बोलत होता. रावसाहेब चौधरी हा मोबाईलवर भुषणला म्हणत होता की भावेश पाटील आपल्या दोघांमधे वाद लावतो. तू त्याला समजावून दे. तो आता माझ्यासोबतच असून माझ्याकडे रिव्हाल्वर आहे. मी त्याला सोडून देतो. तुझे आणि माझे भांडण झाले त्यावेळी भावेशने मला घाणेरडी शिवीगाळ केली होती. त्यावर भुषणने रावसाहेबला समजावून सांगीतले की आपली भांडणे झाली तेव्हा भावेश माझ्याकडे देखील आला होता. आपण दोघे रावसाहेबला जाब विचारु असे तो त्यावेळी म्हणाला होता असे भुषणने रावसाहेबला फोनवर सांगितले. त्यावर रावसाहेबने भुषणला म्हटले की तु भावेशला घाबरतो का? रावसाहेब विषय वाढवत असल्याचे बघून भुषणने त्याला म्हटले की तु एवढ्या रात्री फोन करत जावू नको आणि विनाकारण वाद वाढवू नको.

दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी रात्री आठ वाजेच्या सुमारास भुषण आणि त्याच्या डंपरवरील चालक मनिष पाटील असे दोघे आव्हाणे गावी असलेल्या हॉटेल लक्ष्मीमधे मद्यपान करण्यासाठी गेले. भुषणने बिअर तर मनिषने दारु घेतली. संतापाच्या भरात भुषणने दोन ते तिन बिअरच्या बाटल्या घशाखाली रिचवल्या. त्यामुळे त्याचे डोळे आणि डोके तरारले होते. मनिषने दिड क्वार्टर दारु रिचवली होती. दरम्यान तेथे भुषणचे काही व्यावसायिक मित्र आले. त्यांच्यात बांधकाम झालेल्या घराच्या व्यवहाराची बोलणी सुरु झाली.

दरम्यान व्यवहाराची बोलणी सुरु असतांना भुषणच्या मोबाईलवर जवळपास सोळा ते सतरा वेळा रावसाहेब चौधरी याचे कॉल येण्याचे सत्र सुरु झाले. सतत येणा-या फोनमुळे आधीच मद्याच्या धुंदीत असलेला भुषण वैतागला. पलीकडून बोलणारा भावेश देखील मद्याच्या नशेत असल्याचे त्याच्या बोलण्यातून भुषणला जाणवत होते. रावसाहेब चौधरी हा भावेशच्या तर भावेश हा रावसाहेबच्या तक्रारी भुषणकडे करत होता. दोघेही भुषणच्या मनात राग येईल अशी वक्तव्य करत होते. रावसाहेब भावेशच्या विरुद्ध तर भावेश हा रावसाहेबच्या विरुद्ध भुषणला भडकवत होता. भुषण हा बिअरच्या नशेत असतांना त्याला भावेशचा मोठ्या प्रमाणात राग आला होता.

मद्याच्या नशेत संतप्त झालेल्या भुषणने एका जणाला फोन करुन चॉपर आव्हाणे या गावी मागवून घेतला. एका जणाला तो चॉपर द्यायचा आहे असे कारण सांगून त्याने शालकाला तो चॉपर लवकरात लवकर घेवून येण्यास सांगितले. रात्री साडे दहा वाजता हॉटेल लक्ष्मी येथे भुषणच्या ताब्यात चॉपर आला. दरम्यान रात्री अकरा वाजेपर्यंत भुषणचे रावसाहेब चौधरी आणि भावेश पाटील याच्याशी फोनवर वाद सुरु होते. त्यातच भावेशने फोनवर भुषणला आई आणि पत्नीवरुन अतिशय घाणेरडी शिवी दिली. त्यामुळे भुषणच्या रागाचा पारा चढला. आता भावेशला बघावेच लागेल असे भुषणने मनाशी ठरवले.  

तु आहे तेथे हॉटेलवरच थांब असे पलीकडून रावसाहेबने भुषण यास बजावले. भुषण लक्ष्मी हॉटेलमधे मद्यपान करत असतांना रात्री साडे अकरा वाजता भावेश आणि रावसाहेब तसेच  काही जण आव्हाणे फाट्यावर आले. आम्हाला फाट्यावर घ्यायला या असे रावसाहेबने भुषण यास सांगितले. हॉटेलच्या कॅमे-यात कैद होण्यासाठी याठिकाणी या असे भुषणने रावसाहेब यास म्हटले. मात्र रावसाहेब त्याठिकाणी आला नाही. भुषण याने त्याचा डंपर चालक मनिष यास रावसाहेबकडे जावून त्याला घेवून येण्यास सांगितले. मात्र मनिष देखील गेला नाही. दरम्यान फोनवर झालेल्या संभाषणातून भावेश हा जळगावला गेला असल्याचे भुषण यास समजले. रात्री पावणे बारा वाजता भावेशच्या शोधात भुषण आणि मनिष हे दोघे जळगावला जाण्यास निघाले. भावेशने भुषण यास आई आणि पत्नीवरुन केलेली घाणेरडी शिवीगाळ असलेली रेकॉर्डींग ऐकली. त्यामुळे भुषण मनातून खुपच चिडला होता. राहून राहून त्याला आई आणि पत्नीबद्दल भावेशचे फोनवरील ते घाणेरडे शब्द अस्वस्थ करत होते. 

काही वेळातच भुषण आणि मनिष हे दोघे जळगावला भावेश रहात असलेल्या घराजवळ निवृत्ती नगर परिसरात आले. भावेश रहात असलेल्या घराचा बंद दरवाजा भुषण याने ठोठावला. त्याला बाहेर येण्यास त्याने बजावले.  भावेश त्याच्या लहान मुलीला कडेवर घेवून बाहेर आला. भुषण आणि मनिष या दोघांना बघून तो अतिशय घाणेरड्या शिव्या देऊ लागला. आई व  पत्नीवरुन अतिशय गलिच्छ शिवीगाळ पुन्हा ऐकून दोघे त्याला समजावू लागले. तो दोघांना हाकलून लावत होता. भावेशने मुलीला आत ठेवले. त्याने बचावासाठी रावसाहेब यास कॉल करुन येण्यास सांगितले. रावसाहेब जळगावला येण्यास निघाला.

दरम्यान भावेशने त्याची मोटार सायकल काढली. बाहेर चला असे तो दोघांना म्हणाला. भुषण आणि मनिष हे दोघे त्याच्या मोटार सायकलच्या मागे निघाले. वाटेत बंधन बॅंकेच्या गेटजवळ भावेशने रस्त्यात गाडी उभी केली. भावेशने संतापात भुषणचे केस धरुन उपटले. आणी तो पुन्हा शिवीगाळ करु लागला. तो अंगावर धावून येताच भुषण देखील चवताळून उठला. भुषणला भावेशचा खुप राग आला. संतापात भुषणने चॉपर बाहेर काढला. मनिषने भावेशला घट्ट पकडून ठेवले. भुषणने भावेशच्या छातीवर, पोटावर जवळपास 4 ते 5 वार केले. त्यानंतर मनिषने देखील त्याच चॉपरने 10 ते 15 वार भावेशवर केले. रक्ताच्या थारोळ्यात भावेश पडल्यानंतर दोघांनी चॉपरसह तेथून पळ काढला. भावेशवर चॉपरचे वार करतांना मनिषच्या हाताला जखम झाली होती. त्यामुळे रस्त्याने रक्ताची धार रस्त्यावर पडत होती. भुषण गाडी चालवत होता आणि मनिष मागे बसला होता.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेला भावेश घटनास्थळी विव्हळत पडला होता. काही वेळाने त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. अरुण धनवडे व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक प्रदीप चांदेलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी तसेच शहर पोलिस स्टेशनचे पो.कॉ. तेजस मराठे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर पोलिस पथक दाखल झाल्यानंतर मयत भावेशच्या मोबाईलवर एक कॉल आला. झटापटी दरम्यान देखील त्याला कॉल येत होते, मात्र ते उचलले गेले नाही. नंतर आलेला कॉल पोलिसांनी उचलला. पलीकडून बोलणा-या रावसाहेब यास पो.नि.अरुण धनवडे यांनी त्याला पोलिस स्टेशनला येण्यास सांगितले. काही वेळातच घटनास्थळावर मयत भावेशचे नातेवाईक देखील हजर झाले. मयताची ओळख पटण्यास वेळ लागला नाही.

या घटनेप्रकरणी मयत भावेशचा चुलत भाऊ कैलास मंगल पाटील याने त्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलिस स्टेशनला भुषण रघुनाथ सपकाळे (खेडी खुर्द ता. जळगाव) आणि मनिष नरेंद्र पाटील (आव्हाणे – जळगाव) या दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 531/22 भा.द.वि. 302, 34 नुसार दाखल करण्यात आला.

दरम्यान भुषण सपकाळे आणि मनिष पाटील या दोघांच्या मागावर पोलिस पथक होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे पथक देखील समांतर पातळीवर दोघा संशयितंच्या मागावर होते. घटनेनंतर दोघे मारेकरी दुचाकीने अगोदर यावल शहराच्या दिशेने पळून गेले होते. दोघे यावलच्या दिशेने गेल्याचे तांत्रीक तपासात उघड झाल्यानंतर शहर पोलिस स्टेशनचे पथक त्यांच्या मागावर होते. मात्र पोलिसांना हुलकावणी देत दोघांनी तेथून देखील पलायन केले. दोघे जण तेथून भुसावळला व तेथून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेढे, संतोष मायकल, मुरलीधर बारी आदींचे पथक त्यांच्या मागावर रवाना झाले. दोघे मारेकरी मुंबई येथून पुणे येथे जाण्याच्या तयारीत असतांनाच एलसीबी पथकाने त्यांना मुंबई पुणे मार्गावर पकडले. त्यांना जळगावला आणले गेले. पुढील चौकशीकामी त्यांना जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोघे संशयीत आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास पो.नि. अरुण धनवडे व त्यांचे सहकारी अनिल झुंजारराव करत आहेत.     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here