तुरुंग अधिक्षकांच्या रुममधे संजय राऊत यांची खासगीत भेट घेण्याची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मध्यस्तामार्फत करण्यात आलेली विनंती तुरुंग प्रशासनाने फेटाळून लावली आहे. तुरुंगातील मॅन्यूअलनुसार केवळ रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तीलाच तुरुंग प्रशासनाच्या परवानगीनंतर बंदीला भेटता येत असल्याचे सांगण्यात आले आहे. न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर सामान्य कैद्याची भेट घेतली जाते त्याप्रमाणे संजय राऊत यांची भेट उद्धव ठाकरे यांना घेता येईल असे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 5 सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत अजून चौदा दिवसांची वाढ करण्यात आली असून त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
सक्तवसुली संचलनालयाने राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत 1 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणातील गैरव्यवहार प्रकरणात ईडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना जेलरच्या रुममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मात्र अशी विशेष परवानगी देता येणार नसल्याचे तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव यांनी कोणतेही लेखी निवेदन तुरुंग प्रशासनाला दिले नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या वतीने एका मध्यस्त व्यक्तीचा फोन तुरुंग प्रशासनाकडे आला होता. उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांची तुरुंग अधीक्षकांच्या रुममध्ये भेट घ्यायची असल्याचे सांगण्यात आले होते.