ज्या हातांनी स्विकारले मुर्ती घडवण्याचे सत्कर्म—- त्या हातांनी पत्करले प्रभाबाईंच्या हत्येचे दुष्कर्म    

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): कुंचल्याच्या मदतीने मुर्त्यांना उत्कृष्ट रंगकाम करण्याची कला विश्वास भास्करराव गाढे यांनी आत्मसात केली होती. गणपती आणि दुर्गोत्सव काळात त्यांच्या कामाला मोठ्या प्रमाणात मागणी येत असे. गणपती आणि दुर्गादेवी उत्सव काळात त्यांच्या हातांना मध्यान्ह भोजनाची देखील उसंत रहात नव्हती. साच्यातून निघालेल्या गणपती आणि दुर्गादेवीच्या मुर्त्यांना योग्य ठिकाणी योग्य रितीने कुंचल्याच्या मदतीने रंगकाम करण्यात विश्वास गाढे यांनी जणूकाही प्राविण्य मिळवले होते. या कामाची कसोटी कालांतराने त्यांची सचोटी बनली होती. या सचोटीच्या बळावर त्यांच्याकडे मुर्त्यांना रंगकाम करुन घेण्यासाठी रिघ लागत असे. या कामासाठी त्यांना गणपती आणि दुर्गोत्सव काळात मोठ्या भांडवलाची गरज भासत असे.

मलकापूर शहरात राहणा-या विश्वास गाढे यांचा मुलगा भार्गव हा आता तरुण झाला होता. तो देखील विश्वास गाढे यांना मुर्ती रंगकामात मदत करत होता. विश्वास गाढे यांची पत्नी मलकापूर शहरातील एका शाळेत तासिका तत्वावर कामाला जात होती. मुर्ती रंगकामातून मिळणारे उत्पन्न आणि पत्नीचे मिळणारे मानधन अशा माध्यमातून त्यांचे अर्थार्जन सुरु होते. 

विश्वास गाढे यांच्या घराशेजारी प्रभा माधवराव फाळके या रहात होत्या. मलकापूर नगरपरिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या प्रभा माधवराव फाळके या शांत स्वभावाच्या म्हणून परिसरात सर्वांना परिचीत होत्या. घरात त्यांचा मुलगा रितेश आणि सुन सौ. कोमल असे तिघे जण रहात होते. एकंदरीत प्रभा फाळके यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. सर्व जण सुखाने रहात होते. प्रभा फाळके यांचे शेजारी असलेले विश्वास गाढे यांच्या घरी त्यांचे येणे जाणे होते. गाढे पिता पुत्र मुर्त्यांवर कशा पद्धतीने रंगकाम करतात, त्यांची कला बघण्यासाठी त्या अधुनमधून त्यांच्याकडे येत असत. प्रभा फाळके यांचे गाढे परिवाराकडे नेहमी येणे जाणे असल्यामुळे विश्वास गाढे हे त्यांना बाई म्हणून हाक मारत असत. प्रभा फाळके यांचे राहणीमान निटनेटके होते. त्यांच्या अंगावर नेहमी मौल्यवान दाग-दागिने रहात असत. सेवानिवृत्ती नंतर त्यांच्याकडे चांगला पैसा असेल असा अंदाज गाढे यांनी मनाशी लावला होता.

ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव असल्यामुळे विश्वास गाढे यांच्याकडे मुर्त्यांना रंगकामाचा पसारा पडला होता. मात्र त्या कामासाठी त्यांना भांडवलाची गरज होती. कोरोना कालावधीत त्यांचे काम थंड बस्त्यात गेले होते. दोन वर्षाच्या कोरोना कालखंडानंतर गणेशोत्सवाला सर्वत्र उधान आले होते. मुर्ती उत्पादक आणि विक्रेत्यांनी यावेळी गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने चांगली कमाई करण्याची आशा बाळगली होती. मात्र पैशांची निकड पुर्ण करण्यासाठी कुणाकडे पैसे उधार मागावे असा प्रश्न विश्वास गाढे यांना पडला होता. आपल्या घराशेजारी राहणा-या प्रभा फाळके यांच्याकडे पैसे उधार मागावे असा त्यांनी मनाशी विचार केला. एक-दोन वेळा गाढे यांनी प्रभा फाळके यांच्याकडे उधार पैसे मागून पाहिले. आपल्याला पैशांची खुप गरज असल्याचे विश्वास गाढे यांनी प्रभा फाळके यांच्याकडे बोलून पाहिले. मात्र विविध कारणे सांगून प्रभा फाळके यांनी गाढे यांना पैसे उधार देण्यास नकार दिला. नकार मिळाल्यानंतर देखील गाढे यांनी त्यांना पैसे उधार मागण्याचा प्रयत्न सोडला नव्हता. मात्र प्रभा फाळके यांनी देखील प्रत्येक वेळी शिताफीने गाढे यांना पैसे उधार देण्यास नकार दिला. गणेशोत्सवाचा सिझन अर्थात व्यवसाय तोंडावर आला असतांना पैशांची गरज पुर्ण करण्याचे आव्हान कसे पेलायचे हा प्रश्न विश्वास गाढे यांना पडला होता. काहीही करुन पैशांची पुर्तता करायचीच हा चंग विश्वास गाढे यांनी मनाशी बांधला होता.  

अखेर प्रभा फाळके यांच्या जीवनातील 27 ऑगस्टचा तो काळा दिवस उजाडला. या दिवशी विश्वास गाढे यांच्या पत्नी नेहमीप्रमाणे तासिका तत्वावर शिकवण्यासाठी सकाळीच शाळेत गेल्या होत्या. घरात केवळ विश्वास गाढे व त्यांचा मुलगा भार्गव असे दोघेच जण हजर होते. साडे आठ वाजेच्या सुमारास विश्वास गाढे यांनी मुलगा भार्गव यास नाश्ता घेवून येण्यासाठी दुकानावर पाठवले. त्या कालावधीत शेजारी राहणा-या प्रभा फाळके या गाढे यांच्या घरी आल्या. देवदर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या प्रभा फाळके कायमच्याच घराबाहेर पडल्या. देवदर्शनासाठी जाण्यासाठी निघालेल्या प्रभा फाळके जणूकाही मृत्यूच्या घरात आणि दारात आल्या होत्या. त्यांचा मृत्यू गाढे यांच्या घरातच नियतीने लिहून ठेवला होता. नियती मनुष्याला मृत्यूच्या दिशेने वाटचाल करण्यास भाग पाडत असते. मनुष्य हा नियतीच्या हातातील एक बाहुले असल्याचे म्हटले जाते ते अगदी खरे आहे. विश्वास गाढे यांच्या घरात आलेल्या प्रभा फाळके यांच्या अंगावर त्यावेळी भरपूर दागिने होते.

63 वर्ष वयाच्या प्रभा फाळके यांच्या अंगावरील दागिने बघून विश्वास गाढे यांची नियत फिरली. हे दागिने आपल्याला मिळाले तर आपली सर्व अडचण दूर होईल असा कुविचार विश्वास गाढे यांच्या मनात चमकून गेला. त्यांचा मुलगा भार्गव हा नाश्ता घेण्यासाठी बाहेर गेलेला होता. घरात आलेल्या प्रभा फाळके आणि विश्वास गाढे असे दोघेच जण त्यावेळी हजर होते. त्यावेळी विश्वास गाढे हे गणपती आणि दुर्गादेवीच्या मुर्त्यांना रंग देण्याचे काम करत होते. मुर्त्यांना रंगकाम सुरु असलेल्या खोलीत गाढे यांनी प्रभा फाळके यांना बोलावून घेतले. सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यानची ती वेळ होती.

साहजीकच प्रभा फाळके यांनी कुतुहलाने मुर्त्यांकडे निरखून बघण्यास सुरुवात केली. मुर्ती बघण्याच्या नादात असलेल्या प्रभा फाळके पाठमो-या उभ्या असतांनाच त्यांच्या डोक्यात मागील बाजूने विश्वास गाढे यांनी लाकडी दांड्याने जोरदार प्रहार केला. दागिन्यांच्या लालसेने लाकडी दांड्याने केलेल्या जोरदार हल्ल्यात प्रभा फाळके या लागलीच जमीनीवर पडल्या. त्यांच्या तोंडातून रक्त निघून वाहू लागले. जवळच पडलेल्या भल्या मोठ्या पोत्यात प्रभा फाळके यांचा मृतदेह लपवण्याच्या प्रयत्नात विश्वास गाढे असतांनाच त्याठिकाणी त्यांचा मुलगा भार्गव तेथे आला. 

प्रभा फाळके यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून भार्गव काही वेळ भांबावला. हा काय प्रकार आहे? प्रभाबाई यांना काय झाले? त्यांना तुम्ही मारले का? अशा प्रश्नांची सरबत्ती भार्गवने त्याचे वडील विश्वास गाढे यांच्यावर सुरु केली. मला पैशांची गरज होती म्हणून मी प्रभाबाईंना मारले आहे असे म्हणत असतांनाच विश्वास गाढे यांनी अधाशाप्रमाणे प्रभा फाळके यांच्या अंगावरील दागिने जणूकाही ओरबाडूनच काढले. ते दागिने त्यांनी लागलीच अंगावरील पॅंटच्या खिशात घाईघाईने घालून घेतले. प्रभाबाईंचा मृतदेह पोत्यात भरण्यास मला मदत कर असे त्यांनी भार्गवला म्हटले.

आपल्या पित्याच्या कुकर्मात मदत करण्यासाठी भार्गवने सुरुवात केली. मरण पावलेल्या प्रभाबाईंचा मृतदेह दोघा पिता पुत्राने मिळून अगोदर निळ्या रंगाच्या कागदात गुंडाळला. त्यानंतर तो मृतदेह पांढ-या रंगाच्या गोणीत भरुन त्या गोणीचे तोंड दोराने बांधले. कुणी बघत नसल्याचे बघून गुपचूप ती गोणी मोटार सायकलच्या सीटवर मध्यभागी ठेवण्यात आली. मोटार सायकलवर पुढे चालकाच्या रुपात विश्वास गाढे आणि मध्यभागी असलेले मृतदेहाचे पोते धरुन मुलगा भार्गव मागे बसला. मलकापूर शहरातील तहसील चौकमार्गे रेल्वे पुलाच्या खालून थेट पुर्णा नदीच्या पुलावर दोघे पितापुत्र आले. पुर्णा नदीच्या पुलावर मोटार सायकल उभी करुन दोघांनी मिळून मृतदेहाचे ते पोते नदीपात्रात फेकून दिले.

ज्या रस्त्याने दोघे पितापुत्र आले होते, त्याच रस्त्याने ते घरी परत आले. दुपारी घरी आल्यावर जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात दोघे वावरु लागले. त्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विश्वास गाढे यांनी मलकापूर शहरातील मुथुट फायनान्स कंपनीचे कार्यालय गाठले. प्रभाबाई फाळके यांच्या अंगावरील दागिने तारण ठेवून त्या बदल्यात विश्वास गाढे यांनी 1 लाख 91 हजार 500 रुपयांचे कर्ज मिळवले. अशा प्रकारे आपली पैशांची निकड पुर्ण झाल्याचे समाधान विश्वास गाढे यांना मिळाले. मात्र त्यांचे ते समाधान अल्पकाळ राहिले. दरम्यान प्रभा फाळके बेपत्ता झाल्यामुळे त्यांचा मुलगा व सुन असे दोघेही हवालदिल झाले होते. दोघांनी आपल्या परिने त्यांचा शोध घेण्याचे काम सुरुच ठेवले होते. दोन दिवस उलटून देखील प्रभा फाळके यांचा तपास लागत नव्हता. तसेच त्यांचा मोबाईल देखील लागत नव्हता.

घटनेच्या दोन दिवसांनी 29 ऑगस्ट रोजी मृतदेहाचे पोते पाण्यातून तरंगत वर आले. या पोत्याभोवती माशा घोंघावत होत्या. मृतदेहाची दुर्गंधी परिसरात पसरली होती. त्यामुळे या दुर्गंधीच्या दिशेने परिसरातील काही लोक गेले. या पोत्यात मानवी मृतदेह असल्याचा संशय सर्वांना येण्यास सुरुवात झाली. कुंड गावचे पोलिस पाटील विनोद हिरोळे आणि सुकळी गावचे पोलिस पाटील संदीप इंगळे या दोघांनी हा प्रकार मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला मोबाईलच्या माध्यमातून कळवला. या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर, पोहेकॉ गणेश मनुरे, पोलिस नाईक संतोष नागरे, नितीन चौधरी, पोना धर्मेंद्र ठाकुर, पोना लतीफ तडवी, पोना देवसिंग तायडे, पोना कांतीलाल केदारे आदींनी घटनास्थळ गाठले.

पाण्यातून वहात आलेले आणि बांधलेले मृतदेहाचे ते पोते पुर्णा नदीच्या झाडाझुडूपात अडकले होते. पांढ-या रंगाच्या नॉयलॉन गोणीवर इंग्रजीत “RAMJI INDUSTRIES PVT LTD AKOLA” असे लिहीलेले होते. लाल रंगाच्या दोरीने ते पोते अर्थात गाठोडे बांधलेले होते. पोलिस पथकाने ते पोते सोडून पाहिले असता त्यात निळ्या रंगाच्या प्लॅस्टीक कागदात एका अनोळखी महिलेचा मृतदेह होता.

प्रभा फाळके या मलकापूर येथील महिलेचा तो मृतदेह उपस्थित सर्वांसाठी अनोळखी होता. त्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच पुढील तपासाची दिशा ठरणार होती. मृतदेह कुजल्याने त्यातून जंतू निघून परिसरात दुर्गंधी पसरली होती. अशाही परिस्थितीत मृतदेहासह घटनास्थळाचा पंचनामा पुर्ण करण्यात आला. या घटनेप्रकरणी सुकळी गावचे पोलिस पाटील संदीप सुकदेव इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 297/2022 भा.द.वि. 302, 201 नुसार दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर उप विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले आदींनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. जळगाव जिल्ह्यासह शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला कुणा महिलेची मिसींग दाखल आहे का? याबाबत चौकशी करण्यात आली.

तपासकामाचा भाग म्हणून शेजारील बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेवरील मलकापूर  शहर पोलिस स्टेशनला मयत महिलेचे फोटो मुक्ताईनगर पोलिसांनी पाठवले. दरम्यान प्रभा फाळके यांचा मुलगा रितेश हा मलकापूर पोलिस स्टेशनला त्याची आई बेपत्ता असल्याबाबत मिसींग दाखल करण्यासाठी आला होता. त्याला मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील मयत महिलेचे फोटो आणि वस्तू दाखवण्यात आल्या. सदर महिला ही आपली आई प्रभा फाळके असल्याचे त्याने ओळखले. अशा प्रकारे मयत महिलेची ओळख पटली.

मयत महिलेची ओळख पटल्याची माहिती मलकापूर शहर पोलिसांकडून मुक्ताईनगर पोलिसांना समजली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले, मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलिस  निरिक्षक शंकर शेळके आदी अधिकारी वर्गाचे पथक मलकापुर शहरात दाखल झाले. पुढील तपासाची चक्रे या पथकाकडून वेगाने फिरवण्यात आली. प्रभा फाळके यांचे मारेकरी त्यांच्याच घराच्या परिसरातील असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला.  मयत प्रभा फाळके यांच्या कॉल रेकॉर्डमधे शेवटचा कॉल भार्गव गाढे या तरुणाचा असल्याचे उघडकीस आले. त्या शेवटच्या कॉलचा धागा पकडून पोलिस पथकाने त्याच्यासह त्याचे वडील विश्वास गाढे अशा दोघांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. मारेकरी हे मयताच्या परिसरातीलच असावेत हा संशय पोलिस पथकाला सुरुवातीपासून होता.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पिता पुत्राच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड, मयत प्रभा फाळके यांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. याशिवाय ते रहात असलेल्या परिसरासह  शहरातील सीसीटीव्ही फुटेज संकलीत करुन तपासण्यात आले. या सर्व तपासाची गोळाबेरीज केली असता संशयाची सुई विश्वास गाढे आणि भार्गव गाढे या पिता पुत्रावर जावून स्थिरावत होती.  दोघांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. कर्जबाजारी झाल्यामुळे पैशांची निकड पुर्ण करण्यासाठी आपण प्रभा फाळके यांची हत्या केल्याची कबुली विश्वास गाढे यांनी दिली. या कृत्यात आपला मुलगा भार्गव याने मदत केल्याचे देखील विश्वास गाढे  यांनी कबुल केले. दोघा पिता पुत्रांनी दिलेल्या कबुली जवाबानुसार गोल्ड फायनान्स कार्यालयात जावून तपासणी करण्यात आली. मयत प्रभा फाळके यांच्या अंगावरील विश्वास गाढे याने काढून घेतलेले दागिने तारण म्हणून ठेवल्याचे व त्या दागिन्यांवर कर्ज घेतल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. मयत प्रभा फाळके यांच्या शेजारी राहणा-या गाढे पिता पुत्रांसोबत त्यांचे कौटूंबिक संबंध होते. घटनेच्या दिवशी मयत प्रभा फाळके यांचे व संशयीत आरोपी पिता पुत्रांचे मोबाईल लोकेशन सोबत असल्याचे तपासात आढळून आले. 

मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक राहूल बोरकर, महिला पोलिस उप निरीक्षक परवीन तडवी, पोहेकॉ गणेश मनुरे, मोहंमद तडवी, पोना संतोष नागरे, पोना धर्मेंद्र ठाकुर, पोना नितीन चौधरी, पोना देवसिंग तायडे, पोना कांतिलाल केदारे, सुरेश पाटील, विकास नायसे, पोकॉ मंगल पारधी, राहूल बेहनवाल, पोकॉ रवि धनगर, मुकेश घुगे, पोलिस नाईक लतीफ तडवी, पो.कॉ. विजय कचरे, राजेश महाजन,  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह त्यांच्या पथकातील सहायक फौजदार अनिल पाटील, पोहेकॉ विजयसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, पोहेकॉ दिपक पाटील, पोहेकॉ संदीप पाटील, पोहेकॉ प्रविण मांडोळे, पोहेकॉ किरण धनगर, पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी, पोहेकॉ रविंद्र पाटील, पोहेकॉ मुरलीधर बारी, पोकॉ दिपक शिंदे, उमेशगिरी गोसावी, मुकेश महाजन, रवी  तायडे आणि अनिल देवरे तसेच मलकापुर शहर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक राजपुत व त्यांचे सहकारी आदींच्या पथकाने या गुन्ह्याच्या तपासकामी अथक परिश्रम घेत तपास पुर्ण केला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here