जळगाव : शौचास गेलेल्या बालिकेवर अत्याचार करणा-या वृद्धास जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालाने पिडीत बालिकेसह तिच्या परिवाराला न्याय मिळाला आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायधिस पी.वाय.लाडेकर यांनी आज हा निकाल दिला.
अकरा वर्षाच्या बालिकेस सक्तीने उचलून निर्जनस्थळी नेत तिच्यावर लैंगीक अत्यचार करण्याचा घृणास्पद प्रकार जळगाव नजीक नशिराबाद या गावी 13 ऑगस्ट 2018 रोजी दुपारच्या वेळी घडला होता. या घटनेप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला बलात्कार व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ५ नुसार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन तपास अधिकारी स.पो.नि.रंगनाथ धारबळे यांनी आरोपी तुकाराम रंगनाथ रंगमले यास अटक केली होती. त्यानंतर स.पो.नि.धारबळे यांची बदली झाली. त्यानंतर या गुन्हयाचा तपास स.पो.नि.सचिन बागुल यांच्याकडे आला.
आरोपी तुकाराम रंगनाथ रंगमले (६०) यास न्यायालयाने आज जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर आरोपीतर्फे अॅड.संतोष सांगोळकर यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.