‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अंगुरी भाभी अर्थात अभिनेत्री शुभांगी अत्रे ऑनलाईन फसवणुकीची शिकार झाली आहे. या घटनेमुळे तिला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. शुभांगी ऑनलाइन शॉपिंग करत असतांना तिची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलिसांचीही मदत घेतली जात आहे.
शुभांगीने “8 सप्टेंबर 2022 रोजी एका फॅशन वेबसाइटवरुन काही वस्तूंची खरेदी केली होती. या खरेदीसाठी ती गेल्या तीन वर्षांपासून एक फॅशन अॅप वापरते. त्यामुळे आपल्यासोबत काहीतरी चुकीचे घडू शकेल याची तिला अजिबात कल्पना नव्हती. तिने काही गोष्टी ऑर्डर केल्या. दरम्यान तिला पलीकडून फोन आला. पलिकडून बोलणा-या व्यक्तीने तिला तिच्या घरचा पत्ता आणि ऑर्डर क्रमांक सांगितला. घराचा पत्ता आणि ऑर्डर नंबर ऐकून तिला कॉलबद्दल खात्री झाली. हा सर्व तपशील फॅशन कंपनीकडे उपलब्ध होता.
त्याचवेळी तिच्या खात्यातून लागोपाठ ट्रान्झॅक्शन सुरु झाले आणि तिचे पैसे गेले. या अगोदर तिच्यासोबत दोन महिलांनी फोनद्वारे संवाद साधला. त्यानंतर दोन मुलांशी बोलणे झाले. त्यांनी तिला सांगितले की ती त्यांची प्रीमियर मेंबर आहे, त्यामुळेच ते कंपनीकडून गिफ्टही देणार आहेत. ती गिफ्ट पूर्णपणे मोफत असेल, फक्त जीएसटी भरावा लागेल असे तिला सांगण्यात आले. तिने पेमेंट करताच तिच्या खात्यातून तिचे पैसे वळते होत बॅंक खाते साफ झाले.
ऑनलाइन फसवणूक करणारे नवीन युक्त्या वापरून लोकांची फसवणूक करत असतात. अशा वेळी कुणाला ओटीपी सांगू नका असे आवाहन तिने केले असून गेलेला माझा पैसा कष्टाचा होता असे देखील तिने म्हटले आहे. या पैशांचा कुणी गैर वापर करु नये अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.