जळगाव : पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली फरशी पुलाच्या मागणीसाठी शेतक-यांचे आमरण उपोषण 21 सप्टेबर पासून तहसील कचेरीसमोर सुरु करण्यात आले आहे.
पाचोरा तालुक्यातील नेरी ते सार्वे, पिंप्री, भामरे, खाजोळा आदी गावांना जोडणा-या रस्त्यावर गडद नदीवर तात्काळ फरशी पुल व्हावा ही या उपोषणाची प्रमुख मागणी आहे. हा फरशी पुल झाल्यास सुमारे दोनशे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळेल. शेतकऱ्यांना पिक घेण्यासाठी दहा फुट पाण्यातुन जावे लागते. पुल नसल्यामुळे दोन शेतक-यांनी आपला जीव गमावला आहे.
काही राजकीय सत्ताधा-यांनी निवडणूकीपुर्वी या फरशी पुलाचे खोटे उद्घाटन करुन शेतकरी वर्गाची फसवणूक केल्याचा आरोप सचिन सोमवंशी यांनी केला आहे. फरशी पुलासह इतर विविध मागण्यांसाठी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज सुमारे शंभर शेतकरी आमरण उपोषणाला तहसीलदार कचेरी समोर बसले आहेत. तत्पुर्वी याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे.