मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेला दसरा मेळावा यावेळी शिवाजी पार्कवर कोण घेणार यावरुन सध्या शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु असतांनाच मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेली हस्तक्षेप याचिका फेटाळली आहे. 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्याची सुनावणी करतांना सर्वात अगोदर शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज कुणी केला असा प्रश्न न्यायालयाकडून विचारण्यात आला.
ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय यांनी ठाकरे गटाने 22 आणि 26 ऑगस्ट रोजी अर्ज केला असल्याचे म्हटले. शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी 30 ऑगस्ट रोजी अर्ज केल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. सरवणकरांनी अर्ज केला केवळ एवढेच कारण मनपा सांगत आहे. जर त्यांची कायदा सुव्यवस्था खराब असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. रेकॉर्ड तपासले असता आम्हाला शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी मिळायला हवी.” “गटबाजीतून पोलिसांनी संबंधित अहवाल दिला आहे. पोलीस परिस्थितीवर बोलत नाही. ते एका आमदाराला नियंत्रणात ठेऊ शकत नाही का? आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार करत नाही,” असा युक्तिवाद केला. यावर न्यायालयाने तुमच्याविरोधात इतर काही तक्रारी आहेत का विचारलं. त्यावर चिनॉय यांनी माझ्या माहितीप्रमाणे नाही असं उत्तर दिले. एका आमदाराने तक्रार केली म्हणून एवढ्या वर्षांची परंपरा रोखली जाऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले.
पुढे बोलतांना चिनॉय यांनी म्हटले की “सदा सरवणकरांच्या याचिकेतील पहिल्या आणि शेवटच्या पानावरील माहिती वेगळी आहे. त्यांनी जे म्हटलंय ते केवळ अडथळा निर्माण करण्यासाठी आहे. खरी शिवसेना कुणाची हा या याचिकेचा विषय नाही. याचिकेत त्यांनी हा विषय उपस्थित का केला? आयुक्तांनी देखील शिवसेनेने परवानगी मागितली असल्याचे स्विकारले आहे. या हस्तक्षेप याचिकेचा हेतू केवळ राजकीय कुरघोडी करण्याचा असून हे होऊ देऊ नये.”