खडसे – महाजन – पंकजा मुंडे :  “मिटवता  की पेटवता?”

“मछली जल की राणी है,  जीवन उसका पाणी है”  असे म्हणतात ते उगाच नव्हे. हाच मासा जलाशयातून बाहेर काढून किना-यावर जमीनीवर टाकला तर  पाण्याविना त्याचा जसा प्राण तळमळतो तसेच काहीसे महाराष्ट्रातील काही मंत्र्यांचे झाले आहे. त्यापैकी एक अत्यंत वजनदार, मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिलेले श्रीमान एकनाथराव खडसे. दुस-या  आहेत श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडे. आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे त्यांचे व्यक्त झालेले स्वप्नरंजन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या  एका वक्तव्याचा दाखला देत “मोदीजी हेही आपणास संपवू शकत नाही” असे त्यांचे मध्यंतरीचे वक्तव्य.  श्रीमान खडसे आणि पंकजा या दोघांचे भाजपातले मंत्रीपद जाताच दोघांना सत्तेच्या जलाशतून बाहेर फेकून दिल्यावर मत्स्य (मासा) प्रवर्गातील जीवांना जो दाहक वेदनादायी अनुभव येतो तसा आला. दोघांना प्रचंड वेदना. दिवसा काही सुचेना, रात्री झोप येईना! तशाच अनुभवातून आणखी एक मंत्री बच्चू कडू जात असल्याचे सांगतात. जनतेच्या समस्यांवर प्रशासनाशी – ठेकेदारांशी भिडणारा हा मंत्री शिंदे गटाकडे गेला. हुकले मंत्रीपद. त्याचा राग या भाऊने कार्यकर्त्यावर काढला. मंत्री असतांना या भाऊने म्हणे खराब रस्त्याबद्दल ठेकेदाराची तक्रार करणा-या कार्यकर्त्याच्या कानशिलात हाणली होती. कार्यकर्त्यापेक्षा टक्केवारी देणा-या ठेकेदाराशी मंत्र्याची जवळीक असे म्हटले गेले.

सत्ता गेली की मंत्र्यांना कुणी विचारत नाही असे म्हणतात. हे काही प्रमाणात खरे असले तरी मंत्रीपदावर असतांना काही महाभागांनी जी हजार – बाराशे कोटी, विस – पंचवीस हजार कोटींची, पंचवीस पिढ्यांची, सात जन्माची कमाई करुन ठेवली ती वाचवायची तर  नेहमी सत्तारुढ पक्षातच राहण्याचा जीवघेणा आटापिटा काही नेते करतात. विरोधी पक्षात राहून सत्तेला आव्हान देणारे, भाजपला धडा शिकवण्याची भाषा करणारे कुणी प्रताप सरनाईक, संजय राऊत वगैरेंच्या मागे सोमय्या आणि ईडी, सीबीआय, एनआयए,  एनसीबी कशी हात धुवून लागते त्याचा अनुभव अनेकांनी चाखला आहे. अशाच पद्धतीने शेकडो – हजारो अब्जांची संपत्ती असणा-यांना रात्रीची झोप येत नाही असे म्हणतात. त्यामुळेच राजकारणी नेहमी “आम्ही राजकारणी कायमचे शत्रू नसतो, कालचा शत्रू आजचा मित्र मानतात. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हा फॉर्म्युला देखील वापरतात.

पंतप्रधान मोदीजींनी नोटबंदीचा तडाखा हाणून अनेकांच्या काळ्या कमाईला फटका हाणला होताच. तेव्हाच नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात काही बॅंकामधून नोटा बदलण्याचा खेळ रंगला. जळगाव जिल्ह्यात कधी नव्हे ते काही ठराविक पुढा-यांचे मित्रवर्य शेतक-यांनी जेडीसीसी बॅंकेत तब्बल 225 कोटी रुपयांचे कर्ज रोखीत भरले. त्याची बातमी झळकली. नोटबंदी नंतर बॅंकेत नोटा घेवून आलेल्यांचा मात्र कुणी सत्कार केला नाही. ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कुणी कुणी प्रयत्न केला त्याचा वेगळा इतिहास.

पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरुन भाजप नेतृत्वाला जे पक्ष सोडचिठ्ठीचे इशारे दिले त्या गर्दीत आपण असल्याचे भासवणारे खडसेजी यांनी मात्र “आपणास गृहीत धरु नका” असे घोषित केले. म्हटले  तर पंकजासोबत म्हटले  तर विरोधात. भाजपने सत्तेतून काढल्यावर निवडणूकीपुर्वी राष्ट्रवादीशी चर्चेची हवा सोडून नाथाभाऊंनी तळ्यात मळ्यात गेम खेळला. जळगाव जिल्ह्यात चार – पाच वेळा आमदारकी मिळवणारे गिरीश भाऊ यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजींचे उजवे हात बनल्याची बाजी मारल्यावर त्याच काळात मंत्रीपद गेलेले खडसेजी प्रंचंड संतापले. माझे मंत्रीपद हिरावणा-याला जनता दरबारात हजर करु, महाराष्ट्राचा “सुपारीबाज मुख्यमंत्री”,  एका मास्तरच्या मुलाची 1200 कोटी रुपयांची प्रचंड संपत्ती कशी? भाजपला धडा शिकवू! “त्यांनी ईडी  लावली तर  त्यांची सीडी  दाखवतोच”,  वाण्या ब्राम्हणांचा पक्ष मीच महाराष्ट्रात वाढवला”  असली त्यांची विधानं मागील काळात गाजली. 

दोन वर्षापुर्वी राष्ट्रवदी कॉंग्रेस मधे सामिल होवून विधान परिषदेवर निवड झालेले एकनाथराव खडसे काही महिन्यांपासून भाजपातल्या घडामोडींवर “भाष्यकार” म्हणून प्रसिद्धी पावले. भाजपच्या एका मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नात रंगलेल्या नेत्याप्रमाणे खडसेजींची स्वतंत्र प्रसिद्धी यंत्रणा आहे. मंत्रीपदावर असतांना भाजपा राजवटीत ते “माध्यमे” आपण खिशात घातल्याच्या थाटात बोलत असत. त्यांचा दरारा अन तोरा एवढा की प्रिंट माध्यमांचा त्यांनी जाहीरपणे प्रचंड उपमर्द केला. सकाळी प्रातर्विधीस गेल्यावर “त्याचाच” वापर करतो असे पाठीमागे हात नेण्याची अ‍ॅक्शन करुन ते एकदा जाहीर सभेत म्हणाले होते. नंतर त्यांच्या बाबतीत जे झाले ती त्यांच्या उद्दामपणाची शिक्षा त्यांना मिळाल्याचे काही म्हणाले. तरीही नाथाभाऊंवर प्रेम करणारा एक मोठा वर्ग खानदेशात आहे.

जात समाज घटकात मानव समाजवर्ग विभागला गेला आहे. त्यांच्यावर अन्याय झाल्याच्या भावनेने व्यथित झालेल्या एका वर्गाने भाजपला धडा शिकवण्याची भाषा केली होती. नाथाभाऊंच्या राजकीय घसरगुंडीत गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच जबाबदार असल्याचा निष्कर्ष मांडून झाला. त्यापुढच्या वाटचालीत शिवसेना फुटून पुन्हा एकदा शिंदे – फडणवीस  भाजपची सत्ता आल्याने रा.कॉ. त जीव गुदमरलेले, कासाविस झालेले नाथाभाऊ फार काळ राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे राहतील असे वाटत नाही.  गिरीश महाजनांसोबत “मिटवून घेणे” म्हणजे पुन्हा मुंबईची मांडवली, म्हणजे तोडीपाणी. आपण मिटवण्याचे बोललोच नाही असे नाथाभाऊ म्हणतात. त्यांचे खरे मानले  तर  गिरीशभाऊ खोटे ठरतात. गिरीशभाऊंना पुन्हा आव्हान म्हणजे पेटवापेटवी.

एकंदरीत भाजपश्रेष्ठी अमित शहा यांच्या भेटीत साष्टांग शरणागतीचा सोपास्कर आटोपूनच पुढचा सत्ता सोपान चढता येईल,  आजवरची कमाई वाचवता येईल असा विचार असू शकतो असे जामनेर कॅंम्पचे म्हणणे आहे. अस्तित्व राखण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसला जिल्ह्यात एकही जागा विधानसभेत मिळू देणार नाही असल्या प्रकारची ऑफर देवून सौदेबाजी केली जाईल. भाजपचे जहाज शिंदे समर्थकांच्या ओझ्याने आधिच ओव्हरलोड असतांना भाजपाला आणखी भरती प्रक्रीया  राबवून भाजपचे जहाज बुडवायचे आहे काय? असाही राजकीय निरीक्षकांचा प्रश्न दिसतो. पंकजा मुंडे पक्षातली सारी पदे सोडून सामान्य कार्यकर्त्याच्या भुमिकेत जाऊ पाहताहेत. मात्र या भाऊंकडे तेवढा थांबायला वेळ नाही. “लागला सत्तासुंदरीचा लळा, प्राण तळमळला”  हेच खरे नव्हे काय?  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here