गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटात निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावावरुन खेचाखेची सुरु आहे. आपल्या पक्षाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मिळावे अशी मागणी दोन्ही गटांकडून सुरु होती. अखेर ‘बाळासाहेबांची शिवसेना” हे नाव एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हांबाबत देखील निर्णय दिला आहे. ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला दिलं आहे. मात्र शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगाकडून अमान्य करण्यात आली आहेत. पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश निवडणूक आयोगाने त्यांना दिला आहे. शिंदे गटाने उद्या सकाळपर्यंत तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करायची आहेत. त्यानंतर शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हाबाबत आयोगाकडून निर्णय घेतला जाईल.