जास्त किमतीचे लोणी बाहेर पाठवून वरकमाई!! कमी दर्जाचा माल संघात आणून फरक भरपाई?

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशन आवारात काही दिवसांपुर्वी ठिय्या आंदोलन केले. जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघात लोणी आणि दूध पावडरची (भुकटी) चोरी झाल्याबाबत फिर्याद दाखल करुन घ्यावी अशी त्यांची मागणी होती. या मागणीसाठी त्यांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ आणि त्यातील गैरप्रकार पुन्हा एकवेळा तुफान चर्चेत आणि चव्हाट्यावर आला.

न्यायालयाच्या आदेशाने जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघात फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहार आणि चोरी या दोन प्रमुख घटकांवर बराच खल माजला आणि माजवण्यात आला. राज्य सरकारचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आंदोलना दरम्यान पोलिसांवर केला. दूध संघात चोरी झाली नसून अपहार झाल्याचा एक मतप्रवाह यावेळी प्रदर्शित करण्यात आला.  अपहाराऐवजी चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी माजी मंत्री खडसे आग्रही होते. मात्र याबाबत अभ्यास आणि चौकशी करुनच योग्य तो गुन्हा दाखल करण्यात येईल अशी पोलिस प्रशासनाची भुमिका ठाम होती. अखेर न्यायलयात दाद मागूनच गुन्हा दाखल करु असा पवित्रा घेत खडसे यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

गेल्या ऑगस्ट महिन्यात जळगाव शहर पोलिस स्टेशनला दूध उत्पादक संघातील कर्मचा-याविरुद्ध फसवणूकीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या मालकीचे 1800 किलो तुप 85 रुपये दराने प्रशासक समितीची परवानगी न घेता विठ्ठल रुख्मिनी या एजन्सीला अवघ्या 1 लाख 53 हजार रुपये किमतीत विक्री केल्याच्या आरोपाखाली निखील सुरेश नेहेते रा. दादावाडी – खोटेनगर जळगाव आणि इतर कर्मचा-यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शैलेश सुरेश मोरखडे रा. स्टाफ क्वार्टर विकास डेअरी दुध फेडरेशन जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिसात याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तुप घोटाळ्याचे प्रकरण अंगाशी येत असल्याचे बघून परस्पर संशयीतांकडून सर्व घोटाळा रक्कम जमा करुन केस रफादफा करण्याचे देखील प्रयत्न झाल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.  

या लाखो रुपयांच्या तुप घोटाळ्याचा तपास सुरु असतांनाच करोडो रुपयांच्या लोणी आणी दूध पावडरचा (भुकटी) गैरव्यवहार उघड न करता त्याऐवजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी कामगारांवर दबाव टाकण्यात आला होता असे म्हटले जात आहे. हा करोडो रुपयांचा माल बाहेर गेल्याची पावती तयार करण्यासाठी देखील कामगारांवर दबाव टाकण्यात आला होता असे चोरुन लपून म्हटले जात आहे. अपहार तथा कथित चोरी प्रकरणात दूध संघातील बड्या पदाधिका-यांचा हात असल्याचे म्हटले जात आहे. खोटे गेट चलन आणि बिले तयार करुन तो माल वाई जिल्हा सातारा येथे शितकरणासाठी जात असल्याचे दाखवून परस्पर परराज्यात विकला जात होता असे म्हटले जात आहे.

उत्कृष्ठ दर्जाचे लोणी आणि दुध पावडर परराज्यात परस्पर विकल्यानंतर कालांतराने या मालाची स्टॉक रजिस्टरला तफावत दिसू नये यासाठी देखील हुशारी केल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. वाई येथून हलका दर्जा असलेले कमी किमतीचे पिवळसर लोणी आणून फरक पडणा-या मालाची भरपाई केली जात असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

अपहार अर्थात गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस येणार नाही याची पुरेपूर दक्षता घेवून स्टॉक भरपाई योग्य रितीने करण्याचा खटाटोप केला जात होता असे म्हटले जात आहे. संबंधीत अधिकारी आणि कामगारांच्या मदतीशिवाय हा मिलाजुला व्यवहार पुर्ण होणे शक्य नव्हते असे सुत्रांचे म्हणणे आहे. हा मिलाजुला व्यवहार पुर्ण करण्याकामी मदत करण्यासाठी कामगार तयार नव्हते असे देखील म्हटले जात आहे. खोटी बिले तयार करण्यासाठी एका बड्या पधाधिका-याने आदेश दिले होते असे समजते. तशी चोरुन लपून चर्चा देखील सुरु असल्याचे समजते. मात्र खोटी बिले तयार करण्यासाठी कामगारांची नकारघंटा होती असे म्हटले जाते.

गैर व्यवहार मोठ्या प्रमाणात उघडकीस येण्यापुर्वी आणि अधिक त्रासदायक ठरण्यापुर्वी एका अज्ञानी कामगाराच्या मदतीने खोटे रेकॉर्ड तयार करण्याच्या कामकाजाला सुरुवात झाली होती असे म्हटले जात आहे. अपहाराऐवजी चोरीचा बनाव करुन काही राजकीय नेत्यांना पुढे करुन वरिष्ठ अधिका-यांना चौकशीला सामोरे जाण्याची वेळ येवू नये यासाठी चोरी झाल्याचे दाखवण्याचा हा खटाटोप असल्याचे म्हटले जात आहे. या गैरव्यवहारात मोठे रॅकेट असून दूध खरेदीदारांकडून 2 ते 3 रुपये कमिशन घेवून लोणी विकले जात होते असे देखील सुत्रांकडून म्हटले जात आहे. स्वत:चा चिलींग प्लॅंट असतांना 500 कि.मी. लांब अंतरावरील वाईला शितकरणासाठी माल का पाठवला जात होता? असा देखील प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे. या तपासामधे राज्यशासनाचा कुठलाही दबाव नसल्याचे देखील म्हटले जात आहे. नागराज जनार्दन पाटील यांच्याकडून हा घोटाळा उघडकीस आणण्याचे बरेच प्रयत्न झाले असल्याचे म्हटले जात आहे. मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही.

सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशनला 1 कोटी 15 लाख रुपयांच्या अंदाजीत रकमेच्या अपहार व फसवणूक प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.नं. 335/22 भा.द.वि. 420, 407, 409, 467, 468, 471, 120 (ब) नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता करत आहेत.

फिर्यादीत नमुद केल्याप्रमाणे चाळीसगावचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकांना एक अर्ज दिला आहे. त्या अर्जात नमुद केल्याप्रमाणे जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघातून सुमारे चौदा टन बटर (लोणी), 8 ते 9 टन म्हशीच्या दुधाची भुकटी (मिल्क पावडर) अशा सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये किमतीच्या मालाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे. जळगांव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे चेअरमन, कार्यकारी संचालक व काही मोजक्या कर्मचारी-यांनी अंत्यत हुशारीने व नियोजन पद्धतीने या मालाची विल्हेवाट लावली आहे. सीआरपीसी 154 नुसार फिर्याद दाखल करण्याची विनंती आ. चव्हाण यांनी दिलेल्या अर्जात केली आहे.

दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज गोपाळ लिमये यांच्या तपशीलानुसार 2 ऑक्टोबर रोजी 70 ते 80 लाख रुपये किमतीचे 14 टन पांढरे लोणी दूध संघाच्या बाहेर सातारा जिल्ह्यातील वाई येथे शितगृहात पाठवल्याची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात  गेटवरील रजिस्टरमधे कोणतेही वाहन वाई येथे गेल्याची नोंद पोलिसांना आढळून आली नाही. 9 मेट्रीक टन दुध पावडरची तफावत, मालाची किंमत अंदाजे 30 ते 35 लाख रुपये आणि एकंदरीत 1 कोटी 15 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे लिमये यांनी सुरुवातीला पोलिसांना दिलेल्या 12 ऑक्टोबरच्या तक्रारीत म्हटले. मात्र नंतर दुस-याच दिवशी 13 ऑक्टोबर रोजी लिमये यांनी आपला अपहाराचा सुर बदलत नव्याने  चोरीचा सुर आवळला. 13 ऑक्टोबर 2022 रोजी पोलिस निरीक्षक जळगाव यांच्या नावे दिलेल्या तक्रारीत त्यांनी हा अपहार नसून चोरी असल्याचे म्हटले. सर्व तक्रारींची पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी काढलेल्या निलंबन आदेशात प्रथम दर्शनी अनंत अशोक अंबीकर, महेंद्र नारायण केदार यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या यंत्रणेत मोठा गैरव्यवहार व अफरातफर तसेच खोट्या नोंदी केल्याचे आढळून आले आहे.

एकंदरीत चौकशीअंती जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघात एकुण 1 कोटी 15 लाख रुपयांचा 8 ऑक्टोबर 2022 च्या पुर्वी अपहार झाला असल्याचे पोलिस चौकशीत आढळून आले आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची व शासनाची फसवणुक करुन अपहार केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता करत असून बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here