‘पठाण’ला बसणार ‘बॉयकॉट’ ट्रेंडचा फटका?

शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘बॉयकॉट’ ट्रेंडचा ‘पठाण’ला फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘बॉयकॉट बॉलिवूड’ सर्वात जास्त व्हायरल होणारा हॅशटॅग म्हटला जात आहे. कधीकाळी ज्या बॉलिवूडने हाऊसफुलचा अनुभव घेतला त्या बॉलीवूडला सिनेमा हॉलमधील रिकाम्या खुर्च्यांसह बॉयकॉटचा अनुभव घ्यावा लागत आहे. ‘लाल सिंग चड्डा’, ‘रक्षा बंधन’, ‘दोबारा’, ‘बच्चन पांडे’, ‘ब्रह्मास्त्र, ‘लायगर’, अशा बिग बजेट चित्रपटांवर प्रेक्षकांनी बहिष्कार घातल्याचे आपण पाहिलेच आहे. ‘ब्रह्मास्त्र’ सोडल्यास कोणताही चित्रपट चांगली कमाई करू शकला नाही. आता शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

किंग खान या टोपण नावाने बॉलीवूडमधे ओळखला जाणा-या शाहरुख खान याचा काल वाढदिवस झाला. या दिवशी शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. शाहरुख खानच्या या अ‍ॅक्शनपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्यादेखील भुमिका आहेत. चित्रपटाचा टीझर लोकांना आवडला असला तरी काहींनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.

हा चित्रपट इतर काही चित्रपटांची कॉपी असल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी या चित्रपटाच्या टीझरला ट्रोल केले आहे. काही नेटक-यांनी शाहरुख खानने काही वर्षांपूर्वी केलेली वक्तव्ये शेअर करत या चित्रपटाच्या बॉयकॉटची मागणी केली आहे. या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्स अनेक प्रेक्षकांना आवडलेले नाहीत. अशा अनेक कारणांमुळे या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. पुढील वर्षात 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here