खोटे दस्तावेज तयार करुन कार विक्रीच्या आरोपाखाली चौघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

जळगाव : बॅंकेचे 58 हप्ते थकीत असलेल्या कारचे नोटरीसह खोटे दस्तावेज तयार करुन विक्री केल्याच्या आरोपाखाली चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरधर काशिनाथ सोनवणे, संजय भुतडा, संतोष बडगुजर (सर्व रा. श्री कार बाजार सालार बाजार जवळ लढ्ढा फार्म हाऊस गेटनजीक जळगाव) आणि डॉ. अभिनीत मोतीराम पवार रा. 254 खरैय्या नगर राम मंदीरासमोरचा परिसर अमरावती अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.

शेख मुजम्मील शेख नाजीम रा. रजा कॉलनी मेहरुण जळगाव यांच्या तक्रारीनुसार त्यांनी 13 जून 2016 रोजी त्यांच्या वडीलांच्या नावे असलेले चारचाकी वाहन (एमएच 12 ओएक्स 9070)हे गिरधर काशिनाथ सोनवणे यांच्या कार बाजारात कमिशनवर विक्रीस ठेवले होते. गिरधर सोनवणे यांनी संजय भुतडा व संतोष बडगुजर यांच्या मदतीने साक्षीदार म्हणून नोटरी करुन ते वाहन डॉ. अभिनीत मोतीराम पवार रा. अमरावती यांना विक्री केले. वाहन विक्री केल्यानंतर वाहनावरील कर्जाचे पुढील हप्ते भरले नाही. वाहनाचे खोटे दस्तावेज तयार करुन आपली फसवणूक झाल्याचा आरोप शेख मुजम्मील शेख नाजीम यांनी केला.

याप्रकरणी न्यायालयाकडून कागदपत्रे मिळाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने भा.द.वि. 120 ब, 409, 415, 416, 419, 420, 421, 422, 423, 427, 462, 465, 467, 468, 478 नुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. प्रमोद कठोरे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here