जळगाव : घटस्फोटाच्या खटल्यातील पत्नी नोकरीनिमीत्त मलेशीयात तर पती जळगाव येथे वास्तव्याला आहे. अशा परिस्थीतीत दोघांचा घटस्फोटाचा वाद जळगावच्या कौटूंबिक न्यायालयात सुरु होता. मात्र सध्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे विमानसेवा बंद आहे. त्यामुळे आज कौटूंबिक न्यायालयात दोघांचा ऑनलाईन घटस्फोट झाला.
या खटल्यातील पती पत्नीचे लग्न सन 2018 साली झाले होते. लग्नाचे वेळी पत्नीचे माहेर पुणे होते.
पतीच्या वादाला कंटाळून पत्नी माहेरी पुणे येथे निघून गेली. माहेरी पुणे येथे गेल्यानंतर तिला मलेशीयात नोकरीची संधी मिळाली. त्यामुळे ती पुणे येथून मलेशीयाला निघून गेली. दोघा पती पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. घटस्फोटाच्या तारखेवर पत्नीला हजर राहणे शक्य होत नव्हते. तसेच सध्या कोरोना विषाणूचा कहर लक्षात घेता विमानसेवा देखील बंद आहे.
त्यामुळे आज न्या. रितेश लिमकर यांच्या कौटूंबिक न्यायालयात दोघा पती पत्नीचा व्हिडीओ कॉन्फरंस द्वारे जवाब नोंदवून घेण्यात आला. त्याद्वारे दोघांचा ऑनलाईन घटस्फोट झाला. हिंदू विवाह कायद्याच्या (१९५५) कलम १३ ( बी ) नुसार आज ही घटस्फोटाची प्रक्रीया पुर्ण झाली. महिला वकील ज्योती भोळे यांनी या खटल्यात न्यायालयीन कामकाज पाहिले.