हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे, नुकतीच ती मायदेशी परतली आहे. सध्या ती मुंबईतल्या घरात वास्तव्य करत आहे. करोना काळात ती अमेरिकेत होती. तब्बल तीन वर्षानंतर ती मायदेशी परतली आहे. प्रियांकानंतर आता बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री उषा जाधव भारतात परतली आहे. दिग्दर्शक अविनाश दास यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही माहिती दिली.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावलेल्या उषा जाधव दोन वर्षे स्पेनमध्ये राहिल्यानंतर मुंबईत परतली आहे. मुंबईत येताच तिने दिग्दर्शक अविनाश दास यांची भेट घेतली आहे. त्यांच्या पुढील चित्रपटासाठी नायिका म्हणून उषा जाधवला घेतले आहे. उषा जाधव दीर्घ काळापासून युरोपियन चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. स्पेनमध्ये राहणे तिथली भाषा शिकणे तसेच तिकडच्या काही चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. अविनाश दास यांनी सोशल मीडियावर उषासोबतच्या त्याच्या नवीन चित्रपट पदार्पणाची घोषणा करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
करोना काळात उषा यांनी स्पेनमध्ये राहून सर्व सामाजिक कार्य केले आणि तिथे राहून मुंबईतील काही स्वयंसेवी गटांनी करोना काळात आवश्यक ती मदतही केली. अविनाश यांनी पोस्टमध्ये लिहले ‘उषा आता स्पेनमध्ये राहते आणि आमच्या पुढच्या चित्रपटाचा भाग होण्यासाठी सध्या मुंबईत आहे. आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत.’
उषा जाधवने आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ट्रॅफिक सिग्नल,धग, भूतनाथ रिटर्न, रहस्य, सॉल्ट ब्रिज, बी हैप्पी यांसारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. याचबरोबरीने तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. उषा मूळची कोल्हापूरची आहे.