सोलापूर : आपल्या समाजातील मुलीशी लग्न कर, असे समजावून सांगणाऱ्या वहिनीच्या गळ्यावर ब्लेडने जीवघेणा हल्ला करत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी बाळू लक्ष्मीपती भंडारी (30), रा. निलम नगर, राघवेंद्र नगर जवळ सोलापुर) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सन 2018 मधे ही घटना घडली होती.
फिर्यादी शोभा नरेश भंडारी (35), रा. विडी घरकुल, कुंभारी, ता. द. सोलापूर ही विडी कामगार आहे. आरोपी बाळू भंडारी हा तिचा दीर असून, तो त्यांच्याकडे येत-जात होता. आरोपी बाळू भंडारी यास तिच्या आवडीच्या मुलीशी लग्न करायचे होते. मात्र फिर्यादी व घरातील सर्वजण आरोपीला ‘तुला आपल्या समाजातील मुलगी करुन देऊ’ असे वेळोवेळी सांगत होते.
एप्रिल 2018 मध्ये फिर्यादी महिला घरात एकटी होती. त्यावेळी आरोपी तिच्या घरी आला. ‘तुम्ही, मला माझ्या आवडत्या मुलीशी लग्न का करु देत नाही, तुम्हाला मी दाखवतो’, तुझ्यामुळेच सगळे होत आहे, मी तुला सोडणार नाही, असे म्हणत त्याने फिर्यादी महिलेच्या पाठीमागून येत तिच्या गळ्यावर ब्लेडने जोरात वार केला. याशिवाय ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पळून गेला. त्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याबाबत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अॅड. एन. बी. गुंडे व अॅड. माधुरी देशपांडे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. आरोपीच्या वतीने अॅड. एम. एस. कुरापती यांनी न्यायालयात बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून हवालदार शीतल साळवी यांनी या मदत केली.
सरकार पक्षाच्या वतीने एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीने ज्याच्याकडून घटनेच्या दिवशी ब्लेड विकत घेतले होते तो दुकानदार, फिर्यादी व इतर साक्षीदार आदींची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. फिर्यादी शोभा भंडारी हिचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरी व पन्नास हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास दोन वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली. दंडाची रक्कम फिर्यादी भंडारी यांना नुकसान भरपाईच्या रुपात देण्याचा आदेश दिला. गुन्ह्यात आपल्याला शिक्षा होण्याची शक्यता वाटल्याने आरोपी पळून गेला होता. यामुळे हेड कॉन्स्टेबल शीतल साळवी व राजेश रणदिवे यांनी त्याचा शोध घेत त्याला न्यायालयासमोर हजर केले.