चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नांदेड येथील गोपाळ टोली येथे राहणाऱ्या महिलेशी अनैतिक संबंध ठेऊन तिचा तिच्याच घरी गळा दाबून हत्या केल्याची घटना 24 मे 2020 रोजी घडली होती. यात नांदेड येथील मनोज विठोबा मेश्राम (39) या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. तळोधी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रोशन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आकाश साखरे यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता.
4 नोव्हेंबर 2022 रोजी आरोपी मनोज मेश्राम याला चंद्रपूर सत्र न्यायालयाने आजन्म करावासाची शिक्षा ठोठावली आहे. गोपाळ टोली, नांदेड येथील एका महिलेसोबत मनोज मेश्राम याचे बऱ्याच दिवसापासून अनैतिक संबंध होते. दरम्यान, महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन व पैशाच्या मागणीवरुन दोघंमधे नेहमीच वाद होत असत.
घटनेच्या दिवशी वाद झाल्यानंतर नायलॉन दोरीने गळा आवळून खाटेवरच आरोपीने तिची हत्या केली होती. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून तळोधी पोलीस स्टेशनमध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक रोशन सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम पोलीस उपनिरीक्षक आकाश साखरे यांनी तपास केला.
भा.द.वि. 302, 506 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी, मिलिंद शिंदे यांनी आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र तयार करून सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे सादर केले असता, न्यायालयाने आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.