कोल्हापूर : बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या राग आल्यामुळे दोघा भावांनी तिच्यासह तिच्या पतीची चाकूचे वार करत कृर हत्या केल्याप्रकरणी दोघा सख्ख्या भावांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. गोंधळे यांनी दोषी ठरवले असून शुक्रवारी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गणेश महेंद्र पाटील, जयदीप महेंद्र पाटील (दोघे रा. थेरगाव, ता. शाहूवाडी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघा भावांची नावे आहेत. तिसरा आरोपी नितीन काशीद यास गुन्ह्यात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तीन वर्ष सहा महिने सक्तमजुरी व पाच हजारांचा दंड सुनावला आहे. खूनाची घटना डिसेंबर 2015 मधे घडली होती.
आरोपींची बहीण मेघा (21) हिने पन्हाळा तालुक्यातील सावर्डे येथील इंद्रजित श्रीकांत कुलकर्णी (23) या तरुणासोबत सन 2014 मधे आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. घरच्या मंडळींचा विरोध पाहून त्यांनी सावर्डे येथून कोल्हापुर येथील कसबा बावड्यातील गोळीबार मैदाना नजीक गणेश कॉलनीत खोली भाड्याने घेतली होती.
आरोपी गणेश व जयदीप यांना बहिणीच्या प्रेमविवाहावरुन परिसरातील लोक करत असलेली चेष्टा त्यांना सहन होत नव्हती. त्यामुळे दोघे भाऊ त्यांच्या बहिणीवर चिडून होते. 16 डिसेंबर 2015 रोजी गणेश, जयदीप व नितीन काशीद हे तिघेही एकाच मोटारसायकलने बहिणीच्या घरी आले. त्यावेळी त्यांनी मेघा व तिचा पती इंद्रजित यांची हत्या केली.