जळगाव : मोटार सायकल चोरट्याविरुध्द गुन्हा शाबीत झाला असून त्याला जामनेर न्यायालयाने तिन महिने कैद व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हिरालाल प्रकाश पाटील (लोणी – अडावद ता. चोपडा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. अटकेनंतर अवघ्या तिन दिवसात त्याच्याविरुद्ध जामनेर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर लागलीच दोन दिवसात न्यायालयाने निकाल दिला आहे.
28 नोव्हेंबर 2021 रोजी जामनेर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हिरालाल प्रकाश पाटील यास अटक करण्यात आली होती.
जामनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास हे.कॉ. मुकुंद साहेबराव पाटील तसेच रमेश कुमावत, सुनिल राठोड, डोंगरसिंग पाटील, प्रविण देशमुख, सचिन पाटील, अतुल पवार आदींनी पुर्ण केला. पैरवी अधिकारी हे.कॉ. चंद्रकांत बोदडे, निलेश सोनार यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.