बिहार : विधानसभा निवडणूकीचे राजकारण सध्या बिहारमधे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बिहार राज्याच्या समस्तीपुर जिल्हयात जवळपास दोनशे मागसवर्गीय परिवाराने एकाच रात्रीत सरकारी जागेवर झोपड्या टाकून कब्जा मिळवला आहे. ऐन निवडणूकीच्या वातावरणात असा प्रकार झाल्याने प्रशासनासमोर अडचण निर्माण झाली आहे. या दोनशे परिवारातील लोकांच्या झोपड्या काढून टाकल्या तर विरोधी पक्षाला आयते कोलीत मिळण्याची शक्यता आहे. असे केले तर सरकारला मागासवर्गीय विरोधी म्हणून प्रचार करण्याची संधी विरोधी पक्षाला मिळू शकते.
या मागास परिवारांना सरकारने दिलेली आश्वासने पुर्ण केली नसल्याचा आरोप आहे. दोनशे भूमीहीन मागास परिवाराने कब्जा मिळवलेली ही जागा समस्तीपुर जिल्हयातील उजीयापूरच्या आखा या गावात आहे. सीपीएम नेते अजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली दोनशे परिवारांनी या जागेवर झोपड्या बांधून लाल झेंडा फडकावला आहे. यामुळे याजागेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने वादग्रस्त जमिनीच्या घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात क्यूआरटी, दंगल विरोधी पथक आदी बोलावण्यात आले आहे. सदर जमीन भूसंपादन कायद्यानुसार ठाकूरवाडीचे महंत रामशंकर दास यांच्याकडून सरप्लस घोषित केली आहे. या जागेवर सरकारी कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी प्रक्रीया सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.