अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास आजन्म कारावास

भंडारा : पैशांचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ५४ वर्षीय इसमाला भंडारा जिल्हा – सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अत्याचाराची ही घटना पवनी तालुक्यातील खैरी दिवान येथे ११ मार्च २०१९ रोजी घडली होती.

मार्कड हरिभाऊ उकरे (रा. खैरी दिवान) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. ११ मार्च २०१९ रोजी त्याने गावातील एका अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखविले. शेतात नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच गावातील एका मंदिरातदेखील अत्याचार केला. या घटनेची माहिती तिच्या आईला समजल्यानंतर तिने पवनी पोलीस स्टेशन गाठून याप्रकरणी तक्रार दिली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मार्कड उकरे याला अटक केली. या प्रकरणाचा तपास करून त्याच्याविरुद्ध पुरावे संकलीत करण्यात आले.

सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. असमान यांच्या न्यायालयात सुरु होते. जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. दुर्गा तलमले यांनी याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली. साक्षी पुराव्याअंती आरोप सिध्द झाल्यानंतर मार्कड उकरे याला आजन्म कारावासाची शिक्षा तसेच २५ हजार रुपये दंड सुनावण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here