“बदला” घ्या! एकमेकांच्या “उरावर” बसा!! – महागाई रोजगाराचे काय?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण उद्धव ठाकरे यांचा बदला घेतल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. तत्पूर्वी शिवसेनेतील फोडाफोडी बद्दल त्यांनी शिवसेनेतील एकनाथ शिंदे चाळीस आमदार सोबत घेवून येत असल्यास त्यास नकार कसा देणार? असा प्रश्न टाकून शिवसेना पक्ष फोडीचे समर्थन केले आहे. उद्धव ठाकरे असो की देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्रिपदावर राहिलेल्या दोन नेत्यांनी त्यांच्या राजकीय पक्षापेक्षा महत्वकांक्षा यांना पोषक तसेच राजकारण आजवर केले आहे.

देशातील कट्टर द्वेष कटूतेचे वातावरण संपवा असे म्हटले गेल्याच्या चारच दिवसांनी फडणवीस यांचे बदला प्रकरण समोर आले. कुणीतरी आघात केल्याने झालेल्या प्रचंड नुकसानीची भरपाई म्हणून बदला घेण्याची रित सांगितली जाते. त्यासाठी खून का बदला खून अशा पद्धतीने माणसे खून पाडत सुटतात. परंतू हे राजकारण असल्यामुळे जशास तसे पद्धतीने उत्तर दिले जाते. मागील काळात भाजपसोबत युतीत लढून जिंकल्यावर मात्र मुख्यमंत्री पदासाठी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीत जाऊन ते पद मिळवल्याची उद्धव ठाकरे यांची ती कृती भाजपशी बेईमानीच होती असे फडणवीस पुन्हा पुन्हा छातीठोकपणे सांगत आहेत. उद्धव ठाकरे यांची शक्ती असलेली शिवसेना आधी फोडली. आता ती हायजॅक करण्याचा डाव टाकला आहे.

परंतु हे सगळे देवेंद्र फडणवीस हेच करत आहेत असे म्हणून त्यांना श्रेय देणे चुकीचे ठरेल. दिल्लीश्वर भाजप नेत्यांच्या भूमिकेतून शिवसेनेला हा दणका दिला गेला हे उघड आहे. परंतु नेमकी शिवसेनेची ताकद किती उरली ते 50 हजार कोटीचे वार्षिक बजेट असणाऱ्या मुंबई मनपा निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. गेली पंचवीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा भला मोठा केक ( 50 हजार कोटी आणि सता) भाजपला हवी आहे. महापालिका निवडणूक हे साधन असले तरी हा प्रचंड क्षेत्रफळाचा भूभाग आणि त्यावर जमिनीसह व्यापार क्षेत्रात होणारी अब्जावधींची उलाढाल यावर राजकारण्यांचा डोळा आहे. अशा सत्तेतून शिवसेना आणि या पक्षनेत्यांनी गडगंज कमाई केल्याचे राजकारण्यांचे म्हणणे दिसते. त्यामुळेच शिवसेना ठाकरे गटाचे आर्थिक शक्ती केंद्र ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची एक केस पुण्याच्या कुणा भिडे नामक व्यक्तीने कोर्टात दाखल केली आहे. न्यायालयाच्या माध्यमातून ठाकरे कुटुंबाची चल अचल संपत्ती, स्थावर मालमत्ता जनतेसमोर आणून ही कमाई काळी कि पांढरी असा पेचात पकडण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो. हे सगळे होत असताना शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या “सामना” मधून आता मिटवा म्हणून घातलेली साद, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बदललेली भाषा, निष्ठा प्रदर्शन काय दर्शवते?

काही महिन्यापूर्वीच्या “दिल्लीतून महाराष्ट्रावर चालून येणाऱ्या अफजल खान शाहिस्तेखानाच्या फौजा”, “युती पंचवीस वर्ष सडली”, “कोथळे काढू” या आव्हानांचे काय करायचे? असे प्रश्न 15 कोटी महाराष्ट्रीयनांना अस्वस्थ करत आहेत. तिकडे गुजरात मध्ये निवडणुका आहेत. हा गुजरात मी घडवला अशी गगनभेदी रणगर्जना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. करावे तेवढे थोडेच. मोदी यांच्यासारखा एक नेता छाती ठोकून मोठ्या अभिमानाने गुजरात घडवल्याची डरकाळी फोडतो. आपल्या महाराष्ट्रात काय चित्र आहे? मी किंवा आम्ही महाराष्ट्र घडवतो? असे छातीठोकपणे सांगणारा कुणी दिसतो? महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रसंगी छातीवर गोळ्या घेण्याची तयारी कुणाची दिसते का?

राज्यातल्या बहुसंख्य नेत्यांना त्यांची वडिलोपार्जित संपत्ती, मालमत्ता किमान पंचवीस हजार कोटी वर नेऊन ठेवण्याच्या या महत्वाकांक्षेने पछाडल्याचे दिसते. कुणी कुणाचा बदला घेतो. कुणी कुणाचा पक्ष फोडतो. कुणी बिभीषण डावपेचाने काही मिळवतो. कुणाला लांडग्यांना मेंढ्या चे कातडे पांघरून सत्ता रुपी मेंढ्यांच्या कळपात शिरायचे आहे. रोज रोज नवी नाटके, नवी पात्रे मात्र तेचतेच नेहमीचे यशस्वी कलाकार. तिकडे रोज शेतकरी आत्महत्या करतोय. लोकांच्या हातांना काम मिळत नाही. दोन वेळ जेवणाचे वांधे आहेत. रोज मजुरी करून कसेतरी संसाराचा गाडा ओढत आहेत. कुटुंबाचे उत्पन्न वाढत नाही. कर्ज फिटत नाही. ज्यादा उत्पन्नाचा सनदशीर मार्ग दिसत नसल्याने मरण कवटाळणारे कुणालाच दिसत नाही.

ज्याला त्याला सत्तेची चिंता पडली आहे. दांडगाई दहशतीने कमावलेली, गाठीशी बांधलेली सात पिढ्यांची गाठोडी सांभाळण्याचा राजमार्ग म्हणजे घराणेशाही. एक दोन पोती रेवड्या लोकांच्या अंगावर फेकून सत्ता संपादनाचा खेळ जोरात दिसतो सत्ता चालवणा-यांनी मांडवली करुन मिलबाटके खाओचा मंत्र मास्टर स्ट्रोक म्हणून आणला म्हणजे लोकांनो तुम्ही बोंबला…… निदान त्यांनी एकमेकांचा बदला घेतला, एकमेकांच्या उरावर बसून परस्परांना गुद्दे हाणले तरच त्यांच्या भानगडी– अथांग कमाई जनतेसमोर येथील. चुकीच्या लोकांना धडा शिकवणार्या मार्ग गवसेल असे लोकांमध्ये बोलले जाते. तुम्हाला काय वाटते?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here