पत्रकार मित्र तथा जनता-जनार्दनांं, “पत्रकार निखिल वागळे” अद्याप जिवंत आणि ठणठणीत आहेत. काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर निखिल वागळे यांच्या फोटोसह त्यांना श्रद्धांजली वाहणा-या पोस्ट झळकल्या. काय हा वाह्यातपणा? कोण एका मराठी पत्रकाराच्या जीवावर उठलाय? या वागळे महाशयांनी काय कुणाचं घोडं मारलंय? असं सहज विचारलं जाऊ शकतं. काही दिवसांपूर्वी याच वागळे यांना “ना-लायक” पत्रकार दर्शवणारा व्हिडिओ सुशील कुलकर्णी या दुसऱ्या हिम्मतवाल्या पत्रकाराने जारी केला. तसेच शेकडो लोकांनी वागळे यांना ट्रोल केले. त्यात शिव्यांचा भडीमार आणि जीवे मारण्याच्या धमक्या आहेत. सुशील कुलकर्णी हेही तसलंच मोठं नाव. अनेक विषयांचे सखोल विश्लेषण ही त्यांची स्टाईल. त्यांनी वागळे यांच्या पत्रकारितेची कस कशी वाट लागली, दुकानदारी बसली त्याची चिरफाड केली. लोकशाही आहे. प्रत्येकाला स्वमत प्रदर्शनाचा हक्क आहेच. तेही थोडं ठेऊ बाजूला.
पण दोनच दिवसात हे निखिल वागळे दिवंगत झाल्याचं दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहणा-या छायाचित्रासह पोस्टचा सोशल मीडियावर धुमाकूळ कोण घालतय? निखिल वागळे जिवंत असताना अशा खोट्या बातम्यांचा पाऊस पाडून कोण त्यांच्या जीवावर उठलयं? असा प्रश्न येतो. या प्रश्नाच्या शोधा पूर्वी जरा वागळे यांचा शोध घेवूया. “महानगर” किंवा “दिनांक” अशा दैनिकातून शिवसेनेवर कव्हर स्टोरी करत जोरदार टीका करणारा हा पत्रकार शिवसेनेने हल्ला केल्याने प्रकाशझोतात आला. आपण प्रकाशझोतात अशा पद्धतीने चमकावे असा त्यांचा उद्देश नसावा. खरंतर ही राज्यकर्त्यांची बदललेली कार्यपद्धती. सन 1975 मध्ये महान साहित्यिक दुर्गा भागवत यांनी त्याकाळी जाहीरपणे आणीबाणीला विरोध केला. त्यांच्या अंगावर कोणी धावून गेले नाही. नंतर ज्यांनी विरोध दर्शवला अशा अनेक विरोधी नेत्यांना तत्कालीन सत्तारुढांनी तुरुंगात घातले. हेही जाऊद्या.
आपल्या महाराष्ट्राच्या राजकारण – समाजकारण – साहित्य जीवनाकडे पाहिले तर अनेक वेळा वाद झाले आणि गाजले. एखाद्याने कठोर जहरी टीका केली तरी विचारांचे उत्तर विचारानेच देण्याची इथली परंपरा. जहाल मवाळ यांची भांडणे, आचार्य अत्रे – भावे वाद, “सोबत”कार ग.वा. बेह-यांनी आमदारांनी त्यांचे विशेषाधिकार कोठून आणले? हा विचारलेला प्रश्न गाजला. तेव्हा कोणी कोणाच्या अंगावर धावून गेले नाही, हल्ले तर नाहीच नाही. राज्यातील अनेक मान्यवरांची पिढी याची साक्षीदार ठरावी.
आता वागळे यांच्या बाबत ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांच्या कथित दांभिकपणा चिरफाड करण्याची यांची स्टाईल. हेतू पब्लिक इंटरेस्ट. आपले दुकान चालवण्यासाठी ” न्यूज मेकर्स” किंवा वृत्त संस्थांना निखिल वागळे यांच्यासारखे पत्रकार लागतातच. बस्तान बसले की “बाहेरचा रस्ता” ठरलेला. बहुसंख्य पत्रकार या वाटेनेच वाटचाल करतात. इथे वागळे यांची वकिली करण्याचा हेतू नाही. कोणत्याही पत्रकाराचे काम – त्याची भूमिका बघून त्याला अवश्य वापरावा. पण जेव्हा निखिल वागळे सारखा पत्रकार धडधडीत जिवंत असताना त्याच्या खोट्या मृत्यूच्या बातम्यांचे ट्रोलिंग का व्हावे? श्रद्धांजलीची उठाठेव का व्हावी? महाराष्ट्रात मराठी माणसांच्या हिताच्या गप्पा मारणाऱ्या शिवसेनेने वागळे यांची पत्रकारिता टीका आवडली नाही म्हणून हल्ले केले. आता भाजपही तेच करत असल्याचा थेट वागळे यांचा आरोप आहे. निखिल वागळे यांनी सोशल मीडियावर ते स्वतः जिवंत असल्याचे जाहीर केले. तसे त्यांना करावे लागले हे भयानक आहे. काही दिवसांपासून निखिल वागळे यांना शिव्या – धमक्या येताहेत.
या सगळ्या प्रकारामागे भाजप असल्याचा जाहीरपणे आरोप स्वतः वागळे यांनी केला आहे. आपल्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदार ठरतील हेही निखिल वागळे यांनी त्यांच्या द्वारा जारी व्हिडिओत म्हटलंय. हे सगळ फडणवीस साहेबांच्या इशार्यावरून होतय असंही त्यांचं म्हणणं आहे. राहुल गांधी यांची कव्हर केलेली “भारत – जोडो” यात्रा, कधी देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने “माफीनामा” मुद्द्यांचे केलेले समर्थन, राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा घेतलेला समाचार, राज्यातले उद्योग बाहेर राज्यात गेल्याबद्दल फडणवीस – शिंदे सरकार वर केलेली प्रखर टीका अजिबात सहन झाली नसल्यानेच भाजपच्या आयटी सेल द्वारे असे हल्ले, जीवघेण्या धमकी प्रयोगाला आपण पण मुळीच घाबरणार नाही. निखिल वागळे म्हणतात मी मेलो तरी बेहत्तर, माझी मोहीम थांबणार नाही. मी धमक्या आणि मरणाला भीत नाही. माझे विचार पटत नसतील त्यांनी गोळ्या घालून ठार मारावे. गोळ्या घालून माणूस मारता येतो, विचार नव्हे. माझे विचार जिवंत राहतील. महाराष्ट्रातला हा “वागळे प्रयोग” राज्यभरच्या खऱ्या खोट्या पत्रकारितेची झूल पांघरून वेगवेगळ्या संघटनांच्या टोळी बहाद्दर जिल्हाध्यक्षांना “त्यांनी त्यांचे डोळे फोडून घेतले काय?” असा प्रश्न विचारणारा ठरावा असे निश्चित वाटते. श्रीमान वागळे यांची विचारसरणी पहा, अभ्यासा, स्वीकारा, नाकारा किंवा कचराकुंडीत फेकून द्या. परत आमच्या राज्याचे तालेवार नेते आजचे उद्याचे महाराष्ट्राचे – देशाचे भाग्यविधाते ” चहा पेक्षा किटली गरम” अशा वाटेने कोणत्या दिशेने पुढे निघालेत, हे कोण बघणार? पंधरा कोटीच्या महाराष्ट्र जागा हो. तुर्त इतकेच……