गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपप्रमाणेच काँग्रेस पक्षानेदेखील महाराष्ट्रातील नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी टाकली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर दक्षिण गुजरातमधील तीन मतदारसंघांत प्रचारसभांची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक विकास आणि स्थानिक कामगारांचे होत असलेले शोषण या मुद्यांवर अशोक चव्हाण प्रचार करणार आहेत.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत अशोक चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे. दक्षिण गुजरात भागात मराठी भाषिकांची मोठी संख्या आहे. दक्षिण गुजरातमधील सुरत, नवसारी या दोन मराठीबहुल जिल्ह्यांमध्ये अशोक चव्हाण यांच्यावर प्रचारसभांची जबाबदारी देण्यात आली आहे.
जलालपूर (जिल्हा नवसारी), लिंबायत व उधना (जिल्हा सुरत) या तीन मतदारसंघात अशोक चव्हाण यांनी जाहीर सभा घेतल्या आहेत. या तीनही मतदारसंघांचा प्रचार 29 नोव्हेंबर रोजी संपत आहे. 1 डिसेंबर रोजी याठिकाणी मतदान होत आहे.