अकोला : डीजे वाजवण्यास मनाई करणा-या चार ते पाच पोलिस कर्मचा-यांवर हल्ला केल्या प्रकरणातून तिघांची पुराव्याअभ्यावी अतिरिक्त जिल्हा न्या. डी.बी.पतंगे यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.
विनोद गुलाबराव पुंडकर यांच्या तक्रारीनुसार 1 जून रोजी भांडपुरा येथे माजी नगरसेवक दिवंगत अलियार खान यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा होता. रात्रीचे दहा वाजून गेले तरी देखील डीजे वाजवण्यासह फटाक्यांची आतषबाजी सुरु होती. तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक वडमारे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी डीजे वाजवण्यासह फटाक्यांची आतषबाजी करण्यास मनाई केली. त्यामुळे संतप्त अलियार खान, आझाद खान, फिरोज खान व इतर नातेवाईकांनी आलेल्या पोलिसांना मारहाण केली. या मारहाणीत चार ते पाच पोलिस कर्मचारी व पोलिस निरीक्षक जखमी झाले.
स्वरक्षणासाठी पोलिस निरीक्षकांनी केलेल्या गोळीबारीत वाजीद खान अलियार खान हा जखमी झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. साक्षीदारांची तपासणी केल्यानंतर देखील सबळ पुराव्याअभ्यावी संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.