हिंदी चित्रपटसृष्टीत हिंदी भाषेचा वापरही फार कमी होऊ लागला आहे. बऱ्याचशा हिंदी चित्रपटात इंग्रजी आणि उर्दूसारख्या भाषांचा भडिमार आपल्याला जाणवतो. या चित्रपटात काम करणाऱ्या बऱ्याच कलाकारांना हिंदी धड बोलतासुद्धा येत नाही, बरेच बाहेरचे कलाकार आहेत ज्यांना हिंदी बोलता येत नसूनही मोठमोठ्या चित्रपटात घेतलं जातं. याबद्दल अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाने भाष्य केलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा याने ट्विटरच्या माध्यमातून याबद्दल खंत व्यक्त केली आहे. या ट्वीटमधून लवने हिंदी चित्रपटसृष्टीत हिंदी भाषिक लोकांना मिळणारी वागणूक आणि त्यांना काम न मिळणं याबद्दल खेद व्यक्त केला आहे. इतकंच नाही त्या लोकांच्या अभिनयावरसुद्धा लवने टीका केली आहे.
लव ट्वीटमध्ये लिहितो, “इतर चित्रपटसृष्टीबद्दल मला फारशी माहिती नाही, पण हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांना हिंदी बोलता येत नाही, ज्यांना अभिनय येत नाही त्यांना भरपूर काम मिळतं. मोठमोठे निर्माते, दिग्दर्शक त्यांच्यासाठी पायघड्या घालतात. वास्तविक पाहता त्यांचं हिंदी आणि त्यांचा अभिनय एका प्लॅस्टिक सर्जरीप्रमाणेच असतो.” लवच्या या ट्वीटवर बऱ्याच लोकांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बहीण सोनाक्षी आणि वडीलांप्रमाणेच लव सिन्हासुद्धा अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. २०१० मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. २०१८ च्या जेपी दत्ता यांच्या ‘पलटन’ या चित्रपटातही तो झळकला. शिवाय येणाऱ्या काळात आणखी उत्तम दिग्दर्शकांबरोबर काम करायची इच्छा त्याने व्यक्त केली असून आव्हानात्मक भूमिका त्याला येणाऱ्या काळात साकारायला आवडतील असं लवने एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं आहे.