एमपीडीए कायद्याखाली अमळनेरचा शुभम देशमुख स्थानबद्ध

जळगाव : एमपीडीए कायद्याअंतर्गत अमळनेर शहरातील शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख (रा. पिंपळे रोड संविधान चौक, अमळनेर जि. जळगाव) यास स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध चाळीसगाव शहरला एक आणि अमळनेर पोलिस स्टेशनला सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न प्रवर्गातील तिन, घरफोडीचे नऊ, दरोड्याचा एक, जबरी चोरीचे पाच, चोरीचे सहा, पोलिस रखवालीतून पळून जाण्याचा एक, सरकारी नोकरावर हल्ला केल्याप्रकरणी एक,  शस्र अधिनियमाखाली एक असे एकुण 27 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे.

त्याच्याविरुद्ध दाखल विविध गुन्हयांमध्ये त्याला वेळोवेळी अटक करण्यात आली आहे. न्यायालयातून जामीनावर सुटल्यानंतर देखील त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच रहात  होत्या. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता तो आणि त्याच्यासोबत असणाऱ्या गुंडासोबत घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भिती निर्माण करत होता. त्याला कायदयाचा अजिबात धाक राहिला नव्हता. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षीतेची भावना तयार झाली होती.

दिवसेंदिवस वेगवेगळ्या तऱ्हेने गुन्हे करण्याची त्याची प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांच्या जिवीतास तो उपद्रवी बनला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हात भट्टीवाले, औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम सन 1981 नुसार ‘धोकादायक व्यक्ती’ या संज्ञेत तो मोडत असल्यामुळे त्याच्याविरुध्द कारवाई आवश्यक होती.

अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी त्याच्याविरुद्ध चौकशी पूर्ण करुन 3 जानेवारी रोजी जळगाव पोलिस अधिक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्यामार्फत जिल्हादंडाधिका-यांकडे प्रस्ताव रवाना करण्यात आला होता. शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख अमळनेर यास स्थानबध्दतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील आणि अमळनेर पोलिस स्टेशनचे प्रभारी पो.नि. विजय शिंदे यांच्या संयुक्त पथकातील पोलीस उप निरीक्षक अनिल भुसारे, पोना दिपक माळी, पोना रविंद्र पाटील, पोना किशोर पाटील, पोना सिध्दार्थ शिसोदे, सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल दामोदरे आदींनी शिवम देशमुख यास आज ताब्यात घेत त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here