(स.पो.नि.राहुलकुमार पाटील यांची प्रतिक्रिया)
चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस स्टेशन हद्दीत असलेले धानोरा हे एक मोठे व व्यापारी दृष्टीकोनातून मोक्याचे गाव आहे.
मी अडावद पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम करताना दि. 3 जानेवारी 2019 रोजी धानोरा गावी एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली. एका नराधमाने 5 वर्षाची मुलगी “मिसबाह” व तिचा अडीच वर्षाचा लहान भाऊ “तनवीर” यांना नराधम आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून शेतात नेवून त्यांच्यावर अत्याचार केला होता. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने दोघांना विहिरीत ढकलून त्यांची हत्या केली होती.
दिनेश पाटील हे त्या गावचे पोलिस पाटील होते. त्यांनी मला तात्काळ फोन करून ही माहिती दिली व त्यांनी आरोपी खालिद यास स्वतःच्या घरी बसवून ठेवले असल्याचे सांगितले.मी तात्काळ पुरेसा स्टाफ घेऊन धानोरा येथे रवाना झालो. जाताना सदर घटनेबाबत मा. पोलीस अधीक्षक सो व इतर वरिष्ठांना फोनवरून माहिती दिली. पोलिस पाटलाच्या घराभोवती शेकडोने तरुण जमलेले होते. आरोपीला घडलेल्या घटनेबाबत विचारपूस केली. तो काहीसा वेड्यासारखा बोलत होता. त्याने दोन्ही अल्पवयीन मुलांना कोणत्या विहिरीत ढकलून दिले हे तो दाखवणार होता. त्यासाठी त्याला घेऊन आम्ही पोलिस पाटलाच्या घराबाहेर निघालो. जमाव खूपच संतप्त झालेला होता. सर्व जण ‘त्याला आमच्या ताब्यात द्या’, असे म्हणत होते . धुळे जिल्हयातील “राईनपाडा” येथील चेंगराचेंगरीची घटना ताजीच होती. गावातील वजनदार, ज्येष्ठ मंडळी, पोलिस मित्र यांची साखळी बनवून आम्ही योग्य ती खबरदारी बाळगली व आरोपीला कसेबसे पोलीस गाडीत बसवून त्याला शेताकडे नेले. त्याने दाखवलेल्या विहिरीत मुलांचे मृतदेह शोधण्याकामी पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला. आरोपी हा अंशतः वेडसर असल्याचे गावकरी सांगत होते. तो वेगवेगळ्या विहिरी दाखवत होता. तो दाखवत असलेल्या प्रत्येक विहिरीचा उपसा करून आम्ही मुलांचा मृतदेह शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होतो. रात्र उलटून गेली तरी मृतदेह हाती लागत नव्हते. मा. पोलीस अधीक्षक सर यांनी घटनास्थळी भेट देऊन आम्हाला अमूल्य मार्गदर्शन केले. आरोपीच्या आईला, त्याच्या नातेवाईकांना बोलावून त्यांच्यामार्फत आरोपीला विश्वासात घेवून विचारपूस करण्याचा प्रयत्न सुरुच होता. मात्र आमच्या हाती काही लागत नव्हते. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली. सदर गुन्हा अडावद पोस्टेला भाग 1 गु र नं 3/ 2019 भा.द.वि. कलम 302, 201 नुसार दाखल करण्यात आला. आरोपीला पोलीस स्टेशनला आणले. धानोरा गावच्या शेतातील विहीरींजवळ बंदोबस्त नेमण्यात आला.
सकाळी लवकरच पुन्हा नव्या जोमाने आम्ही मृतदेह शोधण्याची शिकस्त केली. खलिदने आम्हाला एका विहिरीजवळ नेले. त्या विहीरीबाहेर लहान मुलीची एक चप्पल पडलेली दिसली. रात्री अंधार असल्याने व तो घाबरलेल्या अवस्थेत असल्याने कदाचित त्याला रात्री ही विहीर दाखवता आली नसावी. विहिरीत वरून डोकावून पाहिले असता लहान मुलांचे दोन मृतदेह तरंगताना दिसत होते. मुलांचे मृतदेह मिळाल्याची बातमी पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. लोकांची गर्दी जमू लागली. पट्टीचे पोहणारे (डायव्हर्सना) बोलावून मृतदेह दोरीला खाट बांधून विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. अतिशय कोवळी मुलं जणू काही आत्ताच आंघोळ करून न्हाणी घरातून बाहेर आले असावेत, निपचित, शांत असे खाटेवर पडलेले होते. ते दृश्य पाहून माझ्या दोन्ही डोळ्यातून भराभरा अश्रूच्या धारा वाहू लागल्या. जमलेला सर्वच जनसमुदाय हळहळला. मुलांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला. लोक गर्दी करत होते. त्यामुळे आम्ही तात्काळ सदरचा मृतदेह चोपडा येथील रुग्णालयात हलवला. तेथे मुलांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर धानोरा गावात पोलिस बंदोबस्तात मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे मुलांचा अंत्यविधी करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी, चोपडा उपविभाग श्री. सौरभकुमार अगरवाल (भापोसे) यांचेकडे सोपवण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अडावद पोलिसांनी अथक परिश्रम घेत पुरावे गोळा केले. तपासी अधिकाऱ्यांनी केलेल्या अचूक व शास्त्रीय तपासाचे परिणामस्वरूप आरोपी खालिद शेख यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मा. न्यायालयाने सदरचा न्यायनिवाडा करून समाजातील बेलगाम, वासनांध वृत्तीस लगाम लावण्याचा प्रयत्न तर केला आहेच पण, ज्या दारिद्र्याच्या अरिष्टामुळे भुकेने व्याकुळ असलेल्या दोन निष्पाप लहान मुलांना चॉकलेटचे आमिष मृत्यूपर्यंत नेवून सोडते. ती पोटाची भूक आणि निष्पाप बालकांचे हक्क यासाठी आणखी भरीव उपाययोजना होणे अत्यावश्यक आहे हे या निमित्ताने नमूद करावेसे वाटते.
जाहिर झालेला हा निकाल सर्वसामान्यांचा न्यायसंस्थेवरील विश्वास दृढ करणारा व निष्पाप मुलांचे मृतदेह पाहून व्याकूळ होणाऱ्या संवेदनशील मनावर काहीशी फुंकर घालणारा असाच आहे. कर्तव्यपूर्तीचा मनस्वी आनंद होत आहे.निष्पाप मिसबाह आणि तन्वीर यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच अल्लाह ताला कडेस इबादत व परमेश्वर चरणी प्रार्थना आहे.
राहुलकुमार अरुण पाटील
स.पो.नि. डहाणू पोलिस स्टेशन
(तत्कालीन प्रभारी अधिकारी अडावद पोलिस स्टेशन जि. जळगाव)
सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी हे सौरभ कुमार अगरवाल सर हे होते.
ok done