दुकानदाराच्या घरातून पन्नास हजाराची रोकड चोरणारा गजाआड

जळगाव : दुमजली घराच्या खालच्या मजल्यातील खोलीतून पन्नास हजाराची रोकड चोरुन नेणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक  केली आहे. इश्तीयाक अली राजीक अली असे अटक करण्यात आलेल्या पोलिसांच्या अभिलेख्यावरील अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

सादीन शब्बीर पटेल हे तांबापुरा परिसरातील शहीद अब्दुल हमीद चौकात वास्तव्याला असून त्यांचे जळगाव शहरातील बी.जे.मार्केट येथे दुकान आहे. 1 फेब्रुवारी रोजी रात्री ते परिवारासह घराच्या वरच्या मजल्यावर झोपण्यास गेले होते. दुस-या  दिवशी सकाळी त्यांच्या घराचा कडीकोंडा तुटलेला तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त झाल्याचे दिसून आले. घरातून पन्नास हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांना आढळून आले. याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याच्या तपासात अज्ञात आरोपीचा शोध सुरु होता. तपासादरम्यान इश्तीयाक अली राजीक अली या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने हा गुन्हा केल्याचे पो.नि. जयपाल हिरे यांना गोपनीय सुत्रांकडून समजले. पो.नि. जयपाल हिरे यांच्या पथकातील स.फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, सचिन पाटील आदींनी इश्तीयाक अली राजीक अली (रा. शाहुवालीया मशीद जवळ, तांबापुरा, जळगाव) यास तांबापुरा भागातून ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याला अटक करण्यात आली. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तीयाक अली राजीक अली याच्याविरुद्ध यापुर्वी घरफोडीचे सहा व चोरीचे देखील गुन्हे दाखल आहेत.

अटकेतील आरोपी इश्तियाक अली  यास न्या. श्रीमती जे. एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 8 फेब्रुवारी पर्यंत पोलिस  कोठडी  सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अ‍ॅङ. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहीले. सध्या जळगाव शहर व जिल्ह्यात चो-या व घरफोडीच्या घटना वाढलेल्या आहेत. या पार्श्वभुमीवर अटकेतील आरोपी इश्तियाक अली  याच्याकडून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here