अल्पवयीन मुलीचा विनयभंग – तरुणास पाच वर्ष सक्तमजुरी

जळगाव : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस जळगाव सत्र न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शेख आसिफ शेख नबी (24), रा. राजमालती नगर जळगाव असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी शेख आसिफ यास सक्तमजुरीसह पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. विशेष पोक्सो न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.एस. महाजन यांनी हा निकाल दिला. 11 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी अल्पवयीन मुलगी घरी जात असताना शेख आसिफ शेख नबी याने तिच्या पाठीमागून येत तिचा विनयभंग केला. मुलीने आरडा-ओरड केल्यानंतर महिलांनी आरोपी शेख याच्या तावडीतून मुलीची सुटका केली होती.

हा खटला विशेष पोक्सो न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.एस. महाजन यांच्या न्यायालयात सुरु होता. यात सरकार पक्षाकडून एकुण पाच साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. पीडितेसह तिच्या बहिणीची साक्ष न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयासमोर आलेल्या एकुण साक्षीपुराव्याअंती न्यायालयाने शेख आसिफ शेख नबी याला भादंवि कलम 354 अ आणि बा.ले.अ.प्र. अधिनियम 2012 चे कलम 7 व 8 नुसार दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. सरकारपक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता तथा विशेष सरकारी वकील अ‍ॅड. चारुलता बोरसे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.

बा.ले.अ.प्र. अधिनियम 2012 चे कलम 7, 8 नुसार पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा तसेच भादंवि कलम 354 (अ) नुसार तिन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी असे शिक्षेचे एकुण स्वरुप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here