जळगाव : अवैधरित्या वाळू वाहतूक करून मंडळ अधिकाऱ्याची कॉलर पकडत तलाठ्याच्या अंगावर डंपर घातल्याच्या प्रकरणात सोमवारी जिल्हा न्यायालय १ व अतिरिक्त सत्र न्या. सु.श्री. सापटणेकर यांनी डंपर चालकासह त्याच्या साथीदाराला सक्तमुजरीसह दंडाची शिक्षा सुनावली आहे. संजय आसाराम कोळी (३०, रा. वडगाव सद्दो, ता. जामनेर) आणि अन्य एक आरोपी यांना शिक्षा झाली आहे. मोहाडी रस्त्यावर ५ एप्रिल २०१५ रोजी मंडळ अधिकारी राहुल नाईक, तलाठी झी.डी. लांबोळे होता. आणि तलाठी आर. टी. वंजारी, के.एम. बागुल यांच्या पथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले होते.
या दरम्यान चालक संजय कोळी याने राहुल नाईक यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली होती. तर अन्य आरोपीने डंपर सुरू करून तलाठ्यांच्या अंगावर घातला होता. नाईक यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजय कोळी आणि अन्य एक आरोपी या दोघांनाही न्यायालयाने वेगवेगळ्या कलमांखाली सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्यात सरकारपक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी पंच, पोलिस पाटील, तपासी अधिकारी तसेच फिर्यादी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुनीलकुमार चोरडिया यांनी कामकाज पाहिले.