जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : – जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोकर, ता. जळगाव येथील कार्यक्रमात दिले. जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पातील भोकर येथे तापी नदीवरील 150 कोटी रुपयांच्या उंच पूलाचे भूमिपूजन कोनशिला अनावरण करुन व जिल्ह्यातील 270 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाणी पुरवठा मंत्री व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार सर्वश्री. संजय सावकारे, किशोर पाटील, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंद्रकांत पाटील, श्रीमती लताताई सोनवणे, माजी आमदार स्मीताताई वाघ, चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह शासकीय अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी- कष्टकरी यांना केंद्रबिंदू माणून हे सरकार काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या काही योजना, प्रकल्प आवश्यक आहेत. त्यांना तात्काळ मंजुरी देण्यात येत आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर खेत पाणी, हर घर जल या योजनांवर राज्य सरकार प्रामुख्याने लक्ष देत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता सरकारने राज्यातील 22 जलसिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे राज्यातील 5 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल उपसा सिंचन योजनेला 100 कोटी व निम्न तापी प्रकल्पाला 100 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पा मध्ये करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर निम्न तापी प्रकल्पाचा तापी नदीवरील या पुलामुळे 70 किमी वळसा वाचणार आहेत. त्यामुळे हा पूल सर्वाना वरदान ठरणारा आहेत. हर घर नल, जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात 38 हजार गावात कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळावी याकरिता अमरावतीच्या धर्तीवर जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यासाठी एमआयडीसीचे विभागीय कार्यालय जळगाव येथे सुरु करण्यासाठी बैठक घेण्यात येईल. तसेच मुक्ताईनगरी, धरणगाव, चोपडा, पाचोरा, एरडोल येथे एमआयडीसी सुरु करण्यात येईल. जळगाव  जिल्ह्यात वारकरी भवन व लोककला भवन उभारण्यासाठी सकारात्मक विचार करु शिवाय जिल्ह्यातील वाहतुकीसाठी 100 बसेस, पाळधी येथे बालकवी ठोंबरे स्मारक, बहिणाबाई चौधरी स्मारक, धरणगाव येथे उपजिल्हा रुग्णालय व नशीराबाद येथे ग्रामीण रुग्णालय मंजुरीबाबत आणि केळीचा पोषण आहारात समावेश करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह दोन राज्यांना जोडणाऱ्या या पुलाचे स्वप्न आज पूर्ण होत आहे याचा विशेष आनंद आहे. जलजीवन मिशन अतंर्गत राज्यातील 38 हजार गावांमध्ये कामे सुरु असून या कामांच्या माध्यमातून  नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात येत आहे. केळीचा पोषण आहरात समावेश करावा. केळी प्रक्रिया उद्योग सुरु करावा. टोकरेकोळी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, कापसाला हमी भाव देण्याची मागणीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली. ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहे. जळगावात मेडिकल हबचे काम सुरु होत आहे. ग्रामविकास विभगााच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पाडळसे प्रकल्पाचा बळीराजा योजनेत समावेश करुन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.

या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण – भोकर, ता. जि. जळगाव येथे तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन (रु. 150 कोटी), शिवाजी नगर येथील कि.मी. 420/9/11 वरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण- रु. 25 कोटी., मोहाडी (जळगाव) येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम करणे- रु.75 कोटी 31 लाख., म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भुमीपूजन रु. 35 कोटी., जळगाव म.न.पा. हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भुमीपूजन- रु. 42 कोटी., बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम-रु. 40 कोटी., धरणगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम-रु. 57 कोटी. 7) जळगाव व धरणगांव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास कामे- रु. 25 कोटी., जळगाव येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम-रु. 4 कोटी., धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here