आधुनिक राजकारणातील शिवीगाळ पर्व 

माणूस हा समाजप्रिय म्हटला जातो. तो एकट्याने राहण्यापेक्षा सामाजिक जीवन जगू पाहतो. त्यासाठी समाजकारण आणि राजकारण हे दोन पर्याय आहेत. सामाजिक – राजकीय कार्यकर्ता ते नेता अशी ही रचना. राजकारणातून सत्ता आणि प्रचंड पैसा.गाठीशी येतो असे म्हणतात. त्यातही जिल्हा जिल्ह्यात दादा, भाऊ, तात्या, मोठा भाऊ, नानाभाऊ अशी दादा मंडळी तयार झाली आहे. काही संस्थांचे राजकारणातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्षपद पटकावले (म्हणजे विकत घेतले की) मंडळी खर्च वसुलीच्या मागे लागते. त्यातही विरोधकांना किंवा स्वपक्षातल्या स्पर्धकांना शिव्यांची लाखोली वाहण्याची प्रथा सुरु झाली आहे. ती कोणी, केव्हा, कशी सुरु केली? हा संशोधनाचा विषय आहे. 

काँग्रेसी बलदंड राजवटीत (1947 ते 1980) महाराष्ट्राने काही सभ्य,विचारवंत, राजकीय नेते, साहित्यीक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नेते अनुभवले. काही वाद गाजले. एखाद्याचा आणि त्याच्या विचारांचा समाचार घेताना जोरदार टीका विनोदप्रचुर होत असे. व्यंगबाण सोडून घायाळ करण्याची रित होती. साधारण 1974 पासून हवा बदलली. आपण पदाधिकारी म्हणजे सुपरपॉवर असा साक्षात्कार काहींना झाला. म्हणजे जाहीरपणे प्रचंड शिवीगाळ करत काही नेते रुबाब दाखवू लागले. त्याकाळी धुळ्यामध्ये कोणी एक नेता जिल्हा परिषद अध्यक्ष गाजला. हे महाशय त्यांच्या कार्यकाळात मनासारखे काम न झाल्यास 3 – 4 शिव्या आणि एक शब्द अशा व्यस्त प्रमाणात शिवीगाळ करण्यासाठी प्रसिद्ध होते. तसेच काही मोठा भाऊ, छोटा भाऊ मंडळी देखील जिव्हारी लागणारी शिवीगाळ करण्यासाठी कुप्रसिद्ध असल्याचे सांगितले जाते. राज्यात अशाच प्रकारची प्रचंड शिवीगाळ करणा-या काही नेत्यांचे मग खून पडतात. 

चारचौघात एखाद्या नेत्याने कार्यकर्त्यांचा वा समाज घटकाचा अपमान करताच “आता याचा मर्डरच करायला हवा” अशी प्रवृत्ती मनात रुजते. अशा तापट स्वभावाच्या प्ररखड नेत्याचा जळगाव जिल्ह्यात खून झाला होता. माणूस तसा प्राध्यापक होता? कॉंग्रेस पक्षात त्याची होणारी बढती स्पर्धक घटकांना रुचली नाही. आधी त्यांना धमकी देण्यात आली. तशी धमकी आल्याचा जाहीर फलक लावण्यात आला. अखेर त्यांचा सुपारी किलरद्वारे खून पाडण्यात आला. या खूनास अनेक कंगोरे होते. या नेत्याच्या खूनानंतर सिव्हील हॉस्पिटलला जखमी अवस्थेत त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूची थरारक वार्ता पसरली. तेव्हा या खूनाची खात्री करुन घेण्यासाठी दोन आजी – माजी आमदार, खासदार सिव्हील हॉस्पिटलमध्ये सकाळी नऊ वाजता धावले. असो. 

दुसरा एक नेता आमदार बनला. हे साहेब मंत्रीही बनले. अधिका-यांच्या बैठकीत सभ्यपणा सोडून खानदेशी ठेचा जसा तिखट तशी यांची जीभ तिखट फुत्कारे सोडण्यात पटाईत. “तुला नोकरी करायची की नाही? एक मिनिटात हाकलू” वगैरे यांची शब्दावली. एकच वेळा ती ऐकली की प्रशासन सुतासारखे सरळ. यांची लाईन क्लिअर. महाराष्ट्रात काही मंत्री त्यांच्या प्रचंड विद्वत्तेसह सामाजिक, सांस्कृतिक सभ्यतेसाठी गाजले तसे काही शिविगाळ करण्यासाठी प्रसिद्ध. 

धुळे – नगर, पश्चिम महाराष्ट्रात शिविगाळ विद्यापीठाचे अनेक नामांकित “टगे” पदवी प्राप्त टगेगिरी करतांना दिसून आल्याचे सांगतात. पुणे हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीचे उगमस्थान. जपणूक स्थान. पण 1960 चे पुणे आणि आता सन 2023 चे पुणे जमीन आस्मानचा फरक. “अनुनासिक उच्च स्वरात (म्हणजे नाकात) बोलण्याची प्रथा काहींनी पाळली. “शालजोडी”तून टोमणा मारला म्हणजे प्रहार केल्याचा यांचा आनंद. पुढच्या काळात जोडाच हाणायचा तर शाल तरी खराब का करावी? या हेतूने पुण्याबाहेरची मंडळी डायरेक्ट जोडेच हाणू लागली. “तिरकस पुणेरी पाट्या” म्हणून गाजलेले पुणेकर विनोदाच्या अंगाने बोचकारे काढत. कधीकाळी 90 हजार ते दीड लाख लोकवस्तीची पुनवाडी आता 30 लाख लोकवस्तीपर्यंत कॉस्मोपॉलिटन शहर बनल्यान संत ज्ञानेश्वरी ओव्या – संत तुकारामांचे अभंग विसरुन “शिवी” सिलॅबस शिकवण्यापर्यंत पुण्याची मजल गेलीय का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here