शिर नसलेल्या युवकाच्या खूनाचा गुन्हा उघडकीस

नाशिक : केवळ हातातील रबरी बॅंडच्या आधारे  शिर नसलेल्या मयत तरुणाच्या खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 11 फेब्रुवारी 2023 च्या सायंकाळी गंगानगर देवी मंदीरानजीक गोदावरी नदी पात्रात शिर नसलेल्या अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला  होता. ओळख पटू नये म्हणून अज्ञात मारेक-यांनी त्या अनोळखी शिर विरहीत मयत तरुणाला गोणपाटात टाकून ते तारेने बांधून गोदावरी नदीपात्रात टाकले होते. या घटनेप्रकरणी सायखेडा पोलीस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 35/23 भादवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी (नाशिक ग्रामीण) अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच सायखेडा पोलीस स्टेशनचे सपोनि पप्पू कादरी आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली होती. 

मयत तरुणाच्या हातावर गोंदलेले मॉ आणि हितेश ही दोन्ही नावे तसेच अंगावरील कपडे, हातातील पिवळ्या रंगाचे रबर बॅन्ड यावरुन मयताची ओळख पटवण्याचे काम सुरु करण्यात आले. नाशिक ग्रामीण व आयुक्तालय हद्दीतील पोलीस स्टेशन, नजीकचे जिल्हे व राज्यांमध्ये तपासयाद्या व प्रसिध्दीपत्रके प्रसारीत करण्यात आली. मयताच्या हातात मिळून आलेल्या पिवळ्या रंगाच्या रबरी बॅन्डबाबत स्थानिक बाजारात चौकशी केली असता, प्रामुख्याने नाशिक शहर आणि शहरालगतच्या ओझर, पिंपळगाव, आडगाव परीसरात असे रबर बॅन्ड विक्री होत असल्याची माहीती मिळाली. याशिवाय मयतास घटनेच्या चार ते पाच दिवस अगोदर मारण्यात आले असल्याचा अभिप्राय वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या एका  पथकाने घटनास्थळ परीसरात मिळुन आलेल्या भौतिक व तांत्रिक बाबींचे अचूक विश्लेषण केले. या विश्लेषणाच्या आधारे खेरवाडी परिसरातून शरद वसंत शिंदे आणि आलीम लतीफ शेख (दोघे रा. खेरवाडी, ता. निफाड, दोघे मुळ रा. मानोली, ता. मानवत, जि. परभणी) यांना ताब्यात घेण्यात आले.

दोघे तरुण खेरवाडी येथील शेतकरी जगदीश संगमनेरे व संदीप संगमनेरे यांच्या शेतात सालदार म्हणून शेतीकाम करत होते. यातील जगदीश संगमनेरे यांनी मागील महीन्यात पेठ फाटा, नाशिक शहर परिसरातून हितेश नावाच्या मजूरास शेती कामकाजासाठी खेरवाडी येथे आणले होते. तेव्हापासून हितेश हा सालदार शरद व आलीम यांचेसोबत शेतीकाम करत होता. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या  हितेश आणि शरद यांच्यात मोबाईल घेण्यावरून वाद-विवाद झाले. त्यात हितेश याने शरद व आलीम यास नाशिकहून पोरं घेवून येतो व तुमचा बेत पहातो अशी धमकी दिली होती. त्या धमकीचा राग मनात धरून आलीम याने हितेशच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केला. त्या हल्ल्यात हितेश रक्तबंबाळ होत जमीनीवर कोसळून मयत झाला. याच दरम्यान त्यांचे मालक जगदीश संगमनेरे, संदीप संगमनेरे व जगदीश यांचा मुलगा योगेश संगमनेरे असे त्याठिकाणी आले. त्यावेळी घटनास्थळावर घडलेला प्रकार पाहून गावात बदनामी होईल तसेच बटाईने करत असलेली शेती जाईल आणि शेती कामास पुन्हा मजूर मिळणार नाही यादृष्टीने मालक जगदीश व संदीप यांच्या सांगण्यावरून सालदार शरद याने बाजूस पडलेल्या कु-हाडीने हितेशच्या गळ्यावर व मानेवर घाव घालून त्याचे धड व शीर वेगळे केले.

त्यानंतर हितेशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांची सर्वांनी मिळून मृतदेह व शीर हे वेगवेगळ्या गोणपटात टाकून त्यास तारेने बांधून त्यांचेकडील स्विफ्ट कारममधून सायखेडा गावाच्या दिशेने जावून सायखेडा गावातील गोदावरी नदीवरील पुलावरून  मृतदेह व शीर असे नदीत फेकून दिले. यावेळी संदीप व योगेश हे मोटरसायकलने स्विफ्ट गाडीच्या पुढे पुढे चालून रस्त्यात काही अडचण येते का? याची चाचपणी करत होते. शरद वसंत शिंदे, वय ३३, रा. खेरवाडी शिवार, ता. निफाड, आलीम लतीफ शेख रा. खेरवाडी, ता. निफाड, दोघे मूळ रा. मानोली, ता. मानवत, जि. परभणी, जगदीश भास्कर संगमनेरे, संदीप भास्कर संगमनेरे, योगेश जगदीश संगमनेरे, तिघे रा. खेरवाडी ओझर रोड, शिवांजली नगर, खेरवाडी, ता. निफाड यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सायखेडा पोलीस स्टेशनचे सपोनि पप्पू कादरी यांचे पथक करत आहेत.

खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पप्पू कादरी, पोउनि विजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे हे.कॉ. जालिंदर खराटे, पोना विश्वनाथ काकड, सुशांत मरकड, प्रितम लोखंडे, हेमंत गिलबिले, रविंद्र टर्ले, सचिन पिंगळ, कपालेश्वर ढिकले, नवनाथ वाघमोडे, प्रदिप बहिरम, हेमंत गरुड, किरण काकड आदींच्या पथकाने अहोरात्र मेहनत घेत हा क्लिष्ट आणि आव्हानात्मक गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलीस पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास 25 हजाराचे बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here