अखेर पुण्यातल्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत “भरोशाच्या म्हशीला टोणगा” या म्हणीप्रमाणे कसब्यात हमखास जिंकणारच अशी प्रारंभीची हवा पसरलेला भाजपचा उमेदवार पराभूत झाला. भाजपचा 28 वर्षाचा अभेद्य किल्ला कोसळला. तसे पाहिले तर चिंचवडमध्येही भाजपाला दुसरा दणका बसल्याचे मतदानाची आकडेवारी दर्शवते. बंडखोर राहुल कलाटे यांच्यामुळे भाजपच्या अश्विनीताई जगताप जिंकल्या. कसबा पोटनिवडणुकीत उमेदवार हेमंत रासने यांच्यापेक्षा भाजपाच्या विजयासाठी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभ क्षणापासून पुण्यात तळ ठोकला. त्यांचा संकटमोचक म्हटला जाणारा गिरीश महाजनांसारखा राईट हॅन्ड टिळकवाड्यात कृष्णशिष्टाईसाठी तैनात केला.
याक्षणी दोन्ही उमेदवार भाजपाचे. कोर्टाच्या निर्णयाची धाकधुक असलेले मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या गटाच्या मंत्र्याच्या मतदार संघातील 150 कोटीच्या पुलाच्या भूमिपूजनार्थ खानदेशात होते. पुण्यातल्या घडामोडींशी काही देणेघेणे नसल्याच्या थाटात ते अलिप्त राहिल्याचे वृत्त राज्यात फक्त एकाच वृत्तपत्राने दिले होते. मिष्ठान्नाचे भरले ताट समोर येताच भोजनास प्रारंभ करण्यापूर्वीच “प्रथम ग्रासे मक्षिका पत:” प्रमाणे बासुंदीच्या वाटीत माशी पडावी तशा पद्धतीने ब्राह्मणांच्या नाराजीचे मळभ दाटून आले होते. त्याची कृष्णछाया भाजपाला पराभवाच्या गर्तेत घेऊन गेली. थोर जेष्ठतम राजकारणी नेते गिरीश बापट यांच्या कसबा या हुकुमी कार्यक्षेत्रात भाजप उमेदवार पडतोच कसा? अशा पद्धतीने निकालोत्तर ऊर बडवला जात असला तरी भाजपातल्याच काही अंतरात्म्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असाव्यात असे काही नतद्रष्ट बोलतात. “आम्हाला डावलतात ना? भोगा त्याची फळ” असं काहींना वाटतं?
भाजपातल्या एका बड्या नेत्याच्या भावाची पुणे महापालिकेत एंट्री करवण्यासाठी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली, असेही सांगण्यात आले. श्रीमान रासने यांचे महापालिकेत नगरसेवक पदापासून स्थायी समिती अध्यक्ष पदापर्यंतची वाटचाल अकार्यक्षम राहिल्याचं वृत्तपत्रातून गाजवलं गेलं. कसब्यातील हजारावर “वाड्यांचा, रस्त्यांचा,विकासाचा प्रश्न ऐरणीवर आणला गेला. शिवसेना, मनसे, काँग्रेस, असा प्रवास यात्री दोन वेळा विधानसभा लढतीचा अनुभव गाठीशी असलेले रविंद्र धंगेकर यांना मनसेचा छुपा पाठिंबा सांगितला गेला.
अखेरच्या टप्प्यात भाजपाने स्थानिक प्रश्नावरून हिंदुत्वाच्या वळणावर नेलेली ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना यांनी एकजुटीने लढवली. रासने, धंगेकर आणि चिंचवडपेक्षा कसब्यातल्या भाजपच्या पराभवासाठी हा निकाल गाजतोय. भाजपाचा एक मोहरा पडला आहे. आता पुढचा नंबर चंद्रकांत पाटलांचा असे सोशल मीडियातून झळकले आहे. रासने यांना पाडून 2024 मध्ये कुणी स्वतःचा रस्ता मोकळा केला? असाही सोशल मीडिया म्हणतोय. ब्राह्मण – ब्राह्मणेतर वादाची सोनेरी किनार गुंफण्याची कल्पकता कोणाची? लोकमान्य टिळक देशाला आदरणीय. काँग्रेस पक्षाच्या जहाल गटाचे कधीकाळचे नेते. त्यांच्या पुढच्या पिढ्या केसरीवाड्यावर “तिरंगा ध्वज” विसरुन भाजपाच्या विचारधारेत कशा जाऊन पोहोचल्या? हे प्रश्न कुणाला पडत नाहीत. सन 1920 ला टिळक युग संपले. मग आले महात्मा गांधी युग. सन 1920 ते आता 2023 म्हणजे 103 वर्ष आपण राजकारणात पुढे आलो. टिळक युग, गांधी युग, नेहरु युग, काँग्रेस युगातून व्हाया भाजपा मोदी युगात आलो आहोत.
टिळकांच्या केसरीने कसब्यात “भाजपा भुईसपाट” झाल्याची हेडलाइन देणे यातच सारे काही आले. अर्थात प्रत्येक वृत्तपत्राला वृत्तांकन, मत स्वातंत्र्य आहे. टिळकांच्या नावे विद्यापीठही आहे. (त्यांच्या सर्व जाहिराती बहुधा केसरी समूहात अशी काही भावंडांची कुरकुर.असो. त्यात गैर नाही.) पण वृत्तपत्राच्या अशा काही हेडलाईन्स “त्या” पत्राचा कल कोणत्या दिशेने चाललाय ते दर्शवतात. स्वतः लोकमान्य टिळक तुरुंगातून परतले तेव्हा त्यांनी केसरीत छापल्या जाणा-या “टिळक बंधमुक्त” हे शीर्षक बदलून “टिळक सुटले” असा बदल केल्याचा दाखला दिला जातो. असो. इतिहासातून वर्तमानात येतांना राज ठाकरे यांच्या मनसेने बराच छुपा केल्याचे बोलले जाते. चिंचवडमध्ये ज्या वेगाने ते भाजपच्या पाठीशी धावले त्या मानाने कसब्यात त्यांचे इंजिन खुशीत अवतरले. तत्पूर्वी त्यांची प्रिय मर्सिडीज ही गाडी कुण्या भाजप नेत्याने विकत घेतली म्हणतात. एका बड्या नेत्याची चारचाकी गाडी घेण्यासाठी अडीच ते 5 कोटी मोजल्याची चर्चा आहे. असो. कसब्यातल्या आताचा भाजपाचा विजय पक्षाच्या फायद्यापेक्षा कुणाकुणाला तोट्याचा होता? “ब्राह्मण वर्गावर अन्याय कराल तर पराभावाचा फटका खाल” असे तर कुणाला सुचवायचे नाही ना? पैशांच्या पावसाबद्दल न बोललेलेच बरे……