जळगाव : जळगाव जिल्हा शल्य चिकित्सकांसह एकुण तिघा वैद्यकीय अधिका-यांच्या दालनातील एअर कंडीशनर यंत्रे काढण्यात आली आहेत. यात जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. किरण पाटील, प्रशासन अधिकारी कक्षातील डॉ. मिलींद बारी आणि निवसी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.पी. सुपे यांच्या दालनाचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयात एकुण दोन आणि इतर दोघांच्या दालनात प्रत्येकी एक एसी लावण्यात आला होता. ते चार एसी काढण्यात आले आहे. सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी याप्रकरणी पाठपुरावा केला होता. इतर सर्वच शासकीय कार्यालयातील एसी काढण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु आहे.
शासन निर्णयानुसार जे शासकीय अधिकारी सुधारीत वेतन श्रेणीतील वेतन स्तर एस-30 : 144200 – 218200 किंवा त्यापेक्षा अधिक वेतन स्तरामधे काम करतात त्यांनाच वातानुकुलीत यंत्रे (एसी) बसवण्याबाबत सुचना दिल्या आहेत. तरी देखील जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय अधिकारी सर्रासपणे एसीचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. या नियमाला धरुन सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्यानंतर सत्य प्रकाशात आले.
जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक हे दोघे बडे अधिकारी देखील आपल्या शासकीय दालनात एसी लावण्याबाबत पात्र नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांनी देखील आपापल्या दालनातील एसी काढून टाकण्याची कार्यवाही करावी अशी जनतेमधून एकमुखी मागणी होत आहे. त्याकामी सामाजीक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचा पाठपुरावा सुरुच असून याकामी सामान्य रुग्णालयपासून सुरुवात करण्यात आली आहे.
सामान्य रुग्णालयात औषधी विभागासह ज्याठिकाणी खरोखरच एसीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी एसी राहू द्यावे आणि इतर सर्वच अधिका-यांच्या दालनातील एसी काढून टाकण्याचे पत्र दीपककुमार गुप्ता यांनी सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिले होते. त्या पत्राची दखल घेत एसी काढून टाकण्याची कार्यवाही केल्याचे पत्र गुप्ता यांना देण्यात आले आहे. मात्र नियम सोडून आजतागायत वापर करण्यात आलेल्या एसीच्या विज बिलाची उधळपट्टी कुणाकडून व कशी वसुल करायची आणि हे सर्व एसी कोणत्या हेडखाली खरेदी करण्यात आले होते. हे सर्व एसी कोणत्या दात्याने (डोनर) बसवून दिले. एसीच्या बदल्यात त्या डोनरचा कुणी व कसा फायदा करुन दिला? जळगाव शहरासह जिल्ह्यातील देखील अधिकारी वर्गाच्या दालनातील एसी खाली यावेत. या आणि अशा स्वरुपाचे प्रश्न जळगाव जिल्हावासीयांना पडले आहेत. जळगाव जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांनी सर्वात अगोदर आपल्या दालनातील एसी काढल्यास इतर सर्व अधिकारी आपल्या दालनातील एसी काढण्यास अजिबात वेळ लागणार नाही असे देखील या निमीत्ताने बोलले जात आहे.