जळगाव : जळगाव येथे ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटातील शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. अजिंठा विश्रामगृहात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी पार पडला. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला राजकीय उंची लाभणार नाही अशी परिस्थिती ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांच्या बाबतीत हेतु पुरस्सर निर्माण करण्यात आली होती असे परखड मत शिवसैनिक राहुल नेतलेकर यांनी “क्राईम दुनिया” सोबत बोलतांना व्यक्त केले. राहुल नेतलेकर हे गेल्या सुमारे बारा वर्षापासून एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून वावरत होते. मात्र आपल्यावर सातत्याने अन्याय होत असल्याचे बघून आपण मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्याचे नेतलेकर यांनी म्हटले आहे.
माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांच्या कार्यकाळात पक्षाकडून राहुल नेतलेकर यांनी शाखाप्रमुख ते विभाग प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर शहराची जबाबदारी कुलभुषण पाटील आणि गणेश सोनवणे यांनी सांभाळली. राहुल नेतलेकर यांना उपमहानगर प्रमुख पदाची संधी मिळाल्यानंतर जेष्ठ शिवसैनिक चिंतामण अण्णा जैतकर, विठ्ठल कोल्हे, हेमराज परदेशी, माजी उपमहानगरप्रमुख चेतन शिरसाळे, स्व बबलू पिपरिया, मोहन तिवारी, हितेश शहा, युवासेनेचे माजी युवा जिल्हाध्यक्ष प्रितेश ठाकूर, महानगर प्रमुख सुनील ठाकूर यांच्यासह इतर सर्व पदाधिका-यांचे सहकार्य लाभले. या कालावधीत माजी संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर यांच्या सानिध्यात त्यांनी कामकाज केले.
तत्कालीन संपर्क प्रमुख के. पी. नाईक यांच्या कार्यकाळात काही कार्यकर्त्यांवर ते टिळेवाल्याची माणसं (गजानन मालपुरे) असल्याचा ठपका ठेवण्यासह भेदभाव करण्यास सुरुवात झाली असा आरोप राहुल नेतलेकर यांनी केला आहे. आजपर्यंत हा प्रकार सुरु असल्याचे म्हटले जात आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांना राजकीय उंची लाभणार नाही अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली होती असे राहुल नेतलेकर यांनी म्हटले आहे. एक तपाचा राजकीय अनुभव गाठीशी असतांना प्रस्थापितांनी आपल्यावर अन्याय केल्याने आपण मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे राहुल नेतलेकर यांनी म्हटले आहे.