बा मतदारा तु ची ओळखी आता…. खरे सावरकर प्रेमी अन ढोंगी बगळा – लबाड लांडगा

uddhav thackeray

परवाच शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची नाशिक जिल्ह्यातील मुस्लिम बहुसंख्येच्या पट्ट्यातील मालेगाव शहरात प्रचंड सभा झाली. अशी सभा घ्यायची तर दीड दोन कोटीचा खर्च. ते जाऊ द्या. येथील टार्गेट ओरिएंटेड मतपेढी खेचण्याच्या हेतूने केलेल्या भाषणात उद्धवजींनी वीर सावरकरांच्या कथित माफीनाम्यावरुन त्यांच्यावर टीका करणा-या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कराल तर आम्ही सहन करणार नाही अशा शब्दात सुनावले. खरे तर राहुल गांधी यांना असेच सुनवायचे तर मालेगावात जाण्याची काय गरज होती? मुंबईत बसूनही ते करता आले असते. पण काहीवेळा खोटेपणाला खरेपणाचा मुखवटा चढवून वठवलेले नाटक वरचढ ठरते. मालेगावच्या या सभेपूर्वी तशीच गर्दी जमवणारे राज ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील बेकायदा मशीद बांधकाम, माहिमच्या समुद्रालगतच्या दर्गा प्रकरणावर आवाज उठवून आपण कसे हिंदुत्ववादी आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांच्या हिंदुत्व कार्डाला तितकेच दमदार प्रत्युत्तर म्हणून वीर सावरकर प्रेमाचे दर्शन उद्धवजींनी घडवले. शिवाय राज ठाकरे यांनी भोंगे – दर्गा प्रकरणावरून तुम्हाला वा-यावर सोडले तर आम्ही आहोत ना? आमच्या तंबूत या अशा नव्या संरक्षकाच्या भूमिकेत मालेगावची वोट बॅंक आपल्या बाजूने वळवण्याची चतुर खेळी केली खरी. परंतु पहिल्याच वाक्यात गडबड झाली. “येथे जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो” अशी सुरुवात करणारे नेते हे विसरले की आपण मालेगावात असून येथे मुस्लिम बांधवांची  देखील गर्दी जमली होती.

उद्धव ठाकरे गटाकडे नवा मुक्तीदाता, नवा मसीहा अशा आशेने पाहणा-या मुस्लिम बांधवांचा देखील भ्रमनिरास झाला असावा. ज्यांच्याकडे आशेने बघावे तो हिंदू राष्ट्रप्रेमी  सावरकरांबद्दल निष्ठा प्रदर्शन करतोय. लोकशाही रक्षणाचा हवाला देत मुस्लिम मतपेढी सुरक्षित करण्याचा तर हा डाव नव्हे? अशी आशंका बहुसंख्यांच्या मनात उठली असावी? काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल कुणास प्रेम असो – नसो पण या गांधींना जाहीरपणे सुनावल्याबद्दल दस्तुरखुद्द राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसप्रेमींना वाटले असेल की कुठून तीन वर्षापूर्वी यांना सत्तेवर बसवण्यासाठी पाठिंबा दिला. भाजपावाले यांची कणिक तिंबत होते तेच बरे होते.

तसे पाहिले तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशभक्तीबद्दल सर्वांना आदर. त्यांनी घेतलेले कष्ट, ब्रिटिश राजवटीतील छळवाद येथील जनतेने देशभक्ती मानला. महात्मा गांधी खून खटल्यात त्यांना कोर्टासमोर हजेरी द्यावी लागली हा कार्यपद्धतीचा भाग. सावरकरच नव्हे तर आझाद हिंद सेनेचे सशस्त्र लढा पुरस्कर्ते सुभाषचंद्र बोस यांचीही देशभक्ती सर्वमान्य मात्र कार्यपद्धती भिन्न. दोन्ही श्रेष्ठ. पैकी स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचे. म्हणजे या राज्यातील जनभावनेच्या जवळचे. राजकारणात आढळणारी समर्थक आणि विरोधक अशा दोन प्रवृत्तीत विभागणी होतेच. तशी येथेही झाली. उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने सावरकर प्रेमाचे प्रदर्शन करुन हिंदुत्व वोट बँकेवर दावेदारी करण्याचा प्रयत्न केला ते बघून सावध भाजपातून उद्धव ठाकरेंवर ढोंगीपणाचा आरोप करणारा हल्ला झाला.

शिवसेना हायजॅक झाल्यावर मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे यांनीही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमके काय करणार? राहुल गांधी यांच्या थोबाडीत मारणार का? असा प्रतिहल्ला केला. अडीच वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांना उद्देशून कानाखाली सणसणीत हाणून जाळ काढू अशा प्रकारची भाषा वापरल्याने काय गहजब माजला तो जनमनात ताजा आहेच. राज्यात अजूनही “पन्नास खोके – माजलेत बोके” अशा आरोळया  उठवताहेत. कुणी प्रसंगोचित फायदा उठवत महाशक्ती द्वारा लिखित स्क्रिप्ट वाचतो, अजेंडा पुढे नेतो. सत्तेची खुर्ची सांभाळायची म्हणजे जनसेवेचा दिखावा आला. ठाकरे यांचे हे बदलते रुप काहींना भाजपा – ठाकरे जवळ येण्याची चाहूल वाटते. तसे झाले तर आपण संपलो याची भीती काहींना हैरान करुन आहे. या भीतीतूनच एखाद्या पक्षानेत्याने त्यांच्या थोबाडीत हाणण्याचा गरमागरम प्रश्न फेकला जातो.

अडीच वर्षापूर्वी फडणवीस हे सावरकरांवरुन भूमिका जाहीर करा म्हणत तेव्हा शेंडी जानव्याच त्यांचं हिंदुत्व आणि आमचं वेगळं हिंदुत्व सांगितल जाई. भाजप असो की शिवसेना (शिंदे + ठाकरे) की कोंग्रेस – राष्ट्रवादी या सर्व राजकीय पक्षांमध्ये हिंदू नेते आहेत. त्यापैकी कोणकोण शेंडी – जानवेधारी दिसतो. कुणाच्या शेंड्या आचार्य चाणक्य यांच्याप्रमाणे गाठ माराव्या तशा दिसतात? हे देखील जाऊ द्या. हे सर्वपक्षीय सत्तेचे प्रयोग. मुंबई मनपा निवडणूक तोंडावर. विधानसभेचेही ढोल वाजत आहेत. लोकसभा लढाई तोंडावर. नेत्यांच्या लढाईतून जनतेच्या हातात काय लाभणार? कुणी सत्ता लाटली – लुटली. खरे प्रेम, खोटे प्रेम, प्रेमाची नाटके, प्रेमा तुझा रंग कसा? तेही बघून झाले. महाराष्ट्राचा सदा बहार रांगडा आपला माणूस दादा कोंडके यांचे गीत आठवा. “लबाड लांडग ढोंग करतय”. लगीन करायचं सोंग करतय. आणि एका पायावर समाधीस्त दिसणारे ढोंगी बगळे मासा दिसताच चोचीत पकडतात. आता बा मतदारा सावध हो, भावनांचा महासागर आणि भरतीच्या लाटा कितीही उंच उसळू दे…. तू मात्र वाहून जावू नको.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here