जिल्हाधिकारी दालनातील नियमबाहय एसीची सामान्य प्रशासन विभागाने घेतली दखल – विभागीय आयुक्तांवर ओढले ताशेरे  

जळगाव : अधिकार नसतांना, निर्धारीत वेतनश्रेणीच्या नियमात बसत नसतांना देखील जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल हे आपल्या दालनात एसीचा वापर करत आहेत. जिल्हाधिका-यांनी आपल्या दालनातील एसी काढावा एवढेच नव्हे तर त्यांच्या अधिपत्याखाली येणा-या इतर सर्व संबंधीत महसुल अधिका-यांनी देखील त्यांच्या दालनातील एसी काढून टाकावा अशी जळगावचे सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांची मागणी आहे. याप्रकरणी दीपककुमार गुप्ता यांचा पाठपुरावा सुरुच आहे.

दीपककुमार गुप्ता यांनी याप्रकरणी नाशिक विभागीय आयुक्तांसह राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पत्र व्यवहार केला. विभागीय आयुक्तांकडून त्यांच्या अधिकार क्षेत्रात वेळीच कारवाई अपेक्षीत होती. मात्र नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सामान्य प्रशासन विभागाकडे पत्र व्यवहार करुन एक प्रकारे वेळेचा अपव्यय झाला आहे, एकंदरीत टोलवाटोलवी झाली. विभागीय आयुक्तांकडून होत असलेल्या टोलवाटोलवीबद्दल राज्याच्या सामान्य प्रशासनाने ताशेरे ओढले आहेत. आपल्या अधिकार क्षेत्रात कारवाईचे अधिकार असतांना देखील नाशिक विभागीय आयुक्त करत असलेली टोलवाटोलवी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या पत्राने उघड्यावर पडली आहे.

दीपककुमार गुप्ता यांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाशी पत्र व्यवहार केला. त्यांच्या पत्राची राज्याच्या गतीमान सरकारच्या प्रशासन विभागाने गतीने दखल घेतली आहे. राज्याने गतीने दखल घेतली असली तरी काही अधिकारी अतिशय संथ गतीने वरिष्ठांच्या पत्राला बेदखल करत असल्याचे जनतेत खुलेआम म्हटले जात आहे.

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी स.ग.सुर्वे यांनी नाशिक विभागीय आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकारी शासन निर्णयाला अनुसरुन नमूद वेतन स्तरामध्ये काम करत नसतांनादेखील आपल्या दालनात एसी वापरत असून गुप्ता यांच्या तक्रार अर्जावर कार्यवाही अपेक्षीत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कार्यवाही अपेक्षित असतांना उपायुक्त (सा.प्र.वि.) नाशिक विभाग, नाशिक यांनी शासनाकडे या तक्रार अर्जाचा अनावश्यकरीत्या संदर्भ केला असल्याचे देखील म्हटले आहे. स्वत: जिल्हाधीकारी महोदयच आपल्या दालनातील नियमबाह्य एसी काढत नसल्यामुळे इतर अधिकारी देखील एसी काढून टाकण्याच्या कार्याला बेदखल करत असल्याचे म्हटले जात आहे. एकीकडे नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक आपल्या अखत्यारीतील पोलिस अधिका-यांच्या दालनातील एसी काढून टाकण्याच्या सूचना देत असतांना दुसरीकडे महसूल विभागाचे विभागीय आयुक्त मात्र याकामी टाळाटाळ करत असल्याचे दिसत असून सामान्य जनतेत चर्चा सुरु झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here