पन्नास हजाराची मागणी, कोयत्याने हल्ला आणि धमकी – पारोळयात कथीत आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा

जळगाव : पन्नास हजाराची खंडणी मागण्यासह कोयत्याने हल्ला करुन वाळू वाहतूकदारास जखमी करणा-या कथित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल देविदास सरदार असे पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी असलेल्या कथित आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे.

हेमंत मच्छींद्र पवार हा पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील विस वर्षाचा तरुण वाळूचे ट्रॅक्टर चालवण्याचे काम करतो. तु वाळूचे ट्रॅक्टर चालवतो म्हणून पारोळा पोलिस स्टेशनला तुझ्याविरुद्ध अर्ज केले असल्याचे राहुल सरदार याने हेमंत पवार याला म्हटले. तु जर मला पन्नास हजार रुपये दिले तर तुझ्याविरुद्धचे दोन्ही अर्ज मागे घेतो आणि जर नाही दिले तर तुझ्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी आपणास राहुल सरदार याने दिली असल्याचे हेमंत पवार याने फिर्यादीत म्हटले आहे. मी आरटीआय कार्यकर्ता असून काहीही करु शकतो असे म्हणत राहुल सरदार याने हेमंत पवार याला पैशांची मागणी केली.

मी तुला यापुर्वी तेरा हजार रुपये दिले आहेत. आता पैसे देवू शकत नाही असे वाळू वाहतूकदार तरुण हेमंत पवार याने राहुल सरदार याला म्हटले. हेमंतच्या बोलण्याचा राग आल्याने राहुल सरदार याने लोखंडी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात पवार जखमी झाला. हातातील कोयता दाखवत शिवीगाळ करत तु जर गावाच्या बाहेर दिसला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सरदार याने आपल्याला दिल्याचे हेमंत पवार याने म्हटले आहे. याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गु.र.न. 111/23 भा.द.वि. 384, 385, 324, 504, 506, शस्त्र अधिनियम 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. विजय भोई करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here