“विरोधी ऐक्या”ला हात दाखवून अवलक्षण कुणाचे? शरद पवारांबाबतच संशय मनी का आला?

भाजप विरोधात राष्ट्रीय पातळीवर व्यापक आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांना आता गती आल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांची भेट घेऊन केलेल्या चर्चेअंती विरोधी ऐक्याचे तारु मार्गी लागल्याचे दिसते. परंतु गेल्याच आठवड्यात काँग्रेसने देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या विरोधात राजकारण तापवले असतांनाच शरद पवारांनी अचानक अदानी यांची तारीफ केल्याने विरोधी ऐक्याला दणका देण्याचे काम हा गडी करतो की काय? अशी संशयाची पेरणी करत शरद पवारांना टार्गेटवर घेण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी त्यांच्या काही विधानांचा संदर्भ दिला गेला. त्यासाठी पहाटेच्या शपथविधीची पुन्हा आठवण करुन दिली. परंतु शरद पवारांनीही उद्धव ठाकरे यांनी घटक पक्षांना न विचारता त्यांच्याशी सल्लामसलत न करताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला अशा शब्दात त्यांनी ठाकरे कॅम्पवर देखील टोला हाणायला कमी केले नाही.

पहाटेच्या शपथविधीशी पुन्हा सुसंगत भूमिका कोणी घेतलीच तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका असेल असे सांगून शरद पवारांनी पुन्हा अनेकांचे कान टोचले. यदा-कदाचित असे काही झालेच तर आपण पुन्हा अजित दादाला माघारी खेचून आणू असे काही ते म्हणाले नाहीत. या अलीकडच्या घटनाक्रमावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने सुरु झाल्याची हाकाटी पिटण्यात आली. त्यासाठी अनेकांनी स्वतःची छाती पिटली. भाजपची सोशल मीडियात पेरलेली – पोसलेली ट्रोलर्स सेना यात आघाडीवर दिसली. राष्ट्रवादी काँग्रेससह जनमानसात दुहीची बीजे पेरणे, मतभेदांचे तण वाढवणे, संशयाचे वादळ उठवण्यात भाजपाचा कोणी हात धरु शकत नाही हे मात्र नक्की. स्वातंत्र्यानंतर सलग 45 ते 60 वर्ष केंद्रीय राज्यीय सत्तेच्या वर्तुळात काँग्रेसची पाशवी हुकूमत, प्रचंड ताकदीचे नेते असतांनाही शरद पवार यांनी एकट्याने 54 आमदार हमखास निवडून आणण्याचे कौशल्य – ताकद दाखवली. शिवाय 1978 साली वसंतदादांच्या नेतृत्वाचे सरकार पाडून पुलोदचा प्रयोग यशस्वी केला. तेव्हापासून “माधव – गोविंदा”च्या आवडीच्या जोडीद्वारे मिडीयात पाठीत खंजीर खुपसल्याचे नॅरेटीव्ह जनतेत रुजवले जात आहे. आताही अनेकांचा तोच उद्योग सुरु दिसतो. इथे शरद पवार किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तरफदारी किंवा वकिली करण्याचा प्रश्न नाही.  राजकीय नेत्यांप्रमाणेच आजच्या अफाट ताकदीची “मीडिया मॅनेजमेंट” करुन एखाद्याला टार्गेटवर घेऊन शेकडो कोटी लोकांची बेमालुमपणे दिशाभुल करण्याचा खेळ करणाऱ्यांचे बुरखे मुखवटे टराटरा फाडण्याचे काम करायला हवे ना. तेच करत आहोत.

मघाशी म्हटल्याप्रमाणे सन 1947 ते 1980 पर्यंतच्या कालखंडात काँग्रेसी विचारधारा भाजपाला जात्यंध जातीयवादी म्हणत दुषणे देत आली. समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, शे.का.प. आदी मंडळी सेक्युलरिझम – धर्मनिरपेक्षतेचा नारा देत लढत होती. अयोध्येतील बाबरी मशिदीचा ढाचा उध्वस्त करुन राम मंदिर निर्माणाला गती मिळाली असतानाच उजवी विचारधारा प्रबळ ठरल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगींनी तेथील जनतेला शब्द दिल्याप्रमाणे विकास दुबे नंतर अतिक अहमद या माफिया पुत्राचा खात्मा करुन दाखवला. महाराष्ट्रात मात्र जनतेच्या मनावर ठसेल अशी काही मर्दुमकी दाखवण्याऐवजी सत्तेची संधी मिळताच घरच्या तिजो-यांची उंची वाढवत त्यात डॉलर्सच्या थप्प्या कोंबणे, विदेशात ब्लॅक मनी ठेवणे, 700 पिढ्यांची कमाई आजच करण्यासाठी राज्याचा खजिना ओरबाडण्याचा उद्योग सन 1995 आणि 2019 मध्ये कुणी कुणी केला? त्याकडे कुणी फिरुन पाहणार आहे का? कोर्ट विचारते – राजकीय नेत्यांकडे एवढा पैसा कुठून येतो? राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना आपल्या पक्षनेत्याकडे कुठून अब्जावधी रुपये येतात? असा प्रश्न पडत नाही. 1960 ते 1985 च्या काळात राजकारण्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया केला म्हणून गळे काढणाऱ्या विदर्भ – मराठवाडावाल्यांनी त्यांचे मुख्यमंत्री आल्यावर काय दिवे लावले? याचा विचार केलाय? निदान पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारी तरी आली. नंतर सहकारी चळवळ मोडीत काढण्याची मर्दुमकी कोणाची? ते नंतर तपासा.

सन 2019 च्या निवडणुकीनंतर शरद पवारांनी पुलोद 2 चा यशस्वी प्रयोग करुन दाखवला. बहुमताची जादुई फिगर जमवताना काँग्रेसला सोबत घेतांना उद्धव ठाकरे यांना सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राहुल गांधी यांच्या आभार प्रदर्शनास्तव जावे लागले. केवळ शरद पवारांवर विश्वास म्हणून त्यांनी हिरवी झेंडी दाखवली. मीच हे करतो, द्या मला पाठिंबा असे म्हणण्याची उद्धवजींची हिंमत होती का? असती तर कोणी मांणले असते? तेही जाऊ द्या. सत्तेत आलात मुख्यमंत्री बनलात, पुत्रही मंत्रीपदावर बसवला. ज्यांच्या सारथ्थ्याने हे जमले त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गृहमंत्र्याला 100 कोटीच्या आरोपात जेलमध्ये बसवले? तुम्ही सीएम –  परमबीर सिंग, वाझे ही  तुमचीच प्यादी. “वाझे हा लादेन नव्हे” ही कुणाची मुक्ताफळे? पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाचा अधिकार म्हणत आपल्या कलंकीत मंत्र्याच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचा बळी घेण्यात भाजपा इतकीच शिवसेना उबाठा जबाबदार नव्हे काय?

सत्ता गमावल्यावर हिंदुत्वाची आठवण. “कुणी कुणाला बांधील राहू नये” ही भाषा कुणाची? आईच्या दुधाची गद्दारी करणारा मला पक्षात नको हे बोल कुणाचे? तेही जाऊ द्या. राज ठाकरेंच्या प्रचंड सभेत त्यांनी दर्गा मशिदीची प्रकरणे काढून हिंदुत्वाचा नारा दिला. भाजपासोबत राज ठाकरे यांना शिंगावर घेताना मालेगाव, संभाजीनगर( औरंगाबाद)च्या प्रचंड सभांमध्ये गलितगात्र शरीरात पंचप्राण फुंकल्याप्रमाणे ज्यांच्या पाठिंब्यावर खुर्ची मिळवली त्याच काँग्रेसच्या राहुल गांधींना दणका देण्याची मर्दुमकी कुणाची? ज्यांच्या बळावर मुख्यमंत्रीपद भोगले त्या शरद पवार, संजय राऊत, काँग्रेस –  राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्षांना न विचारताच फेसबुकवर राजीनामा देण्याचा विक्रम कुणी रचला? आपला नेता फ्लोअर टेस्ट ऐवजी चंबू गबाळे आवरुन घरी पळतोय हे बघणाऱ्या शिवसेना मंत्री आमदारांनी या नेत्यावर विश्वास का करावा?  

जसे सेनेचे तसे काँग्रेसचे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा फेकला राजीनामा. मंत्री बनून हजार पंधराशे कोटी कमावण्याची स्वप्ने माणसाला स्वस्थ बसू देत नाही म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेस असो ,काँग्रेस असो की भाजपा – प्रत्येक पक्षात मुख्यमंत्रीपदाची पहाट स्वप्ने बघणारे भरपूर. या स्वप्नपूर्तीसाठी कधी याचा बळी घे, कधी त्याचा बळी घे, तिकिटे कापाकापी, जेलमध्ये रवानगी हे कुणाचे उद्योग? शरद पवारांना 1999 पासूनच भाजपची ऑफर. हवं तर विचारा अरुण गुजराथींना. सन 2014 मध्येच पवारांनी सरकार बनवण्यासाठी भाजपाला बिनशर्थ पाठिंब्याची ऑफर दिली होती.  शिवसेना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी ती चाल असली तरी तेव्हाच भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला आत घेऊन सेनेला सत्तेबाहेर फेकू शकली असती. शेवटी ही राजकीय पक्ष, विचारधारा  आणि नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यासाठी सावरकर प्रेम, महात्मा गांधी, पंडित नेहरु, अदानी भ्रष्टाचार, 50 खोकी, 100 खोकी, 5000 खोक्यांकडे जाणाऱ्या समृद्धीच्या हायवेवरचे हे सारे प्रवासी. मित्रांचा खिसा कापणे, मालमत्ता पक्ष बळकावणे – छाटणे असे हे सत्तेचे प्रयोग. मदतीचा हात द्या आणि हात मोडून घ्या – गळ्यात बांधा हे कुणाला मान्य? याचा कुणी विचार करायचा?

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here