चाकूने प्राणघातक हल्ला करणा-यांविरुद्ध गुन्हा

जळगाव :  दगडाने तोंडावर आणी चाकूने पोटावर मारहाण करत प्राणघातक हल्ला करणा-याविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद दगडू मोरे (रा. पारोळा ह.मु. नाशिक) असे जखमीचे तर सुभाष श्रीपत चौधरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.

सतिष तरीलाल चौधरी हे 25 एप्रिल रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात जात असतांना त्यांना जखमी अवस्थेत शरद दगडू मोरे हे जमीनीवर पडले असल्याचे दिसून आले. जवळच भाजी कापण्याचा चाकू आणि त्याची वेगळी झालेली मुठ तसेच त्यांचा मोबाईल पडलेला होता. त्याचवेळी जखमी शरद दगडू मोरे यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. तो कॉल उचलून पलीकडून मोबाईलवर बोलणा-या मनोहर संदानशिव यांना सतिष चौधरी यांनी घटनास्थळावरील प्रकार कथन केला.  घटनेची माहिती मिळाल्यानंतर भागवत संदानशिव (रा. म्हसवे ता. पारोळा) यांनी लागलीच रुग्णवाहिकेसह धाव घेत जखमी शरद मोरे यांना कुटीर रुग्णालयात दाखल केले.

जखमी शरद मोरे यांना मारहाण करणा-या सुभाष चौधरी यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 307, 326, 324, 323, 34 तसेच आर्म अ‍ॅक्ट 3(2), (व्ही) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. जखमी शरद मोरे यांना पुढील उपचारार्थ धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास उप विभागीय अधिकारी राकेश जाधव करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here