टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या नावे फसवणूक करणा-या टोळीस अटक

जळगाव : टुर्स अ‍ॅण्ड ट्रव्हल्सच्या नावे ऑनलाईन फसवणूक करणा-या टोळीतील तिघांना जळगाव सायबर पोलिस स्टेशनच्या पथकाने अटक केली आहे. रिकाडों गोम्स पिता क्रिस्टफर गोम्स, प्रियांशु विसवास पिता सवाल बिसवास आणि अनिकेत विसवास पिता अभिजीत विसवास अशी कोलकाता येथून अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून आठ मोबाईल हॅण्डसेट, सिमकार्ड सह तिन संगणक हार्ड डिस्क, आठ एटीएम कार्ड, दोन चेकबुक, लॅपटॉप, विस हजार रुपये रोख आणि शिक्का असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

डॉ. उल्हास बेंडाळे व त्यांचे दहा सहकारी मित्रांना सेव्हन सिस्टर बघण्यासाठी जायचे होते. त्या दृष्टीने शोध घेत असतांना फेसबुकवर Thinktrip Travels या नावाची जाहिरात त्यांच्या बघण्यात आली. या जाहीरातीमधे संबंधीत सहलीबाबत सेव्हन सिस्टर (नॉर्थ ईस्ट) विस रात्र आणि एकवीस दिवसांसाठी  एका व्यक्तीस साठ हजार रुपये व जोडप्यांसाठी एक लाख विस हजार रुपये असे नमुद करण्यात आले होते. त्यानुसार डॉ. उल्हास बेंडाळे यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकवर फोन करुन बोलणी केली.

पुढील टप्प्यात विविध स्वरुपातील खर्चानुसार एकुण 11 लाख 3 हजार 800 रुपये ऑनलाईन जमा करण्यात आले. मात्र पलीकडून बोलणा-या व्यक्तींनी सहल बुक झाल्याचे भासवून प्रत्यक्षात फसवणूक केल्याचे उघड झाले. याप्रकरणी सायवर पोलिस स्टेशनला भाग 5 गुरनं 08/2023 भा.द.वि. क.409,420,34 सह आयटी अ‍ॅक्ट  66(डी) नुसार 13 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी वर्गाने तपासाअंती आरोपी हे कोलकाता, पश्चिम बंगाल येथील असल्याचे निष्पन्न करुन त्यांना अटक केली.  पोउपनि दिगंबर थोरात, पोहेकॉ राजेश चौधरी, पोना दिलीप चिंचोले, पोकॉ गौरव पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here