हरवलेली दोन्ही बालके पालकांच्या स्वाधीन

जळगाव : खेळत असतांना हरवलेल्या दोन बालकांना शोधून त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या या कामगिरीसह बालकांची माहिती देणा-या सुज्ञ नागरिकाचे देखील बालकांच्या पालकांनी आभार व्यक्त केले आहे.

दि. 18 मे 2023 रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील रायपुर कुसुंबा येथे कार्तिक जयसिंग परदेशी हा सहा वर्षाचा आणी त्याच्यासोबत प्रियांशु अजयकुमार वर्मा हा चार वर्ष वयाचा बालक हे दोन्ही सोबत खेळत होते. खेळत असतांना दोन्ही बालक अचानक बेपत्ता झाले. अचानक हरवलेल्या बालकांमुळे त्यांचे पालक हवालदिल झाले. दोन्हीबालकांच्या पालकांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला धाव घेत आपली कैफियत मांडली.

यापैकी कार्तिक हा बालक मुकबधीर होता. पालक आणी पोलिस यांच्याकडून आपल्या पातळीवर दोघा बालकांचा शोध सुरु असतांना कानळदा रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथील रहिवासी रिजवान शेख गणी यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला संपर्क साधला. दोन अनोळखी बालके एमआयडीसी परिसरातील साईनगर परिसरात फिरत असून ती रडत असल्याची त्यांनी माहिती दिली.

माहिती मिळताच पो.नि. जयपाल हिरे यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. ईम्तीयाज खान, पो.ना. ईम्रान सैय्यद, पो.ना. सचिन पाटील, महिला पोलिस नाईक  निलोफर सैय्यद, साईनाथ मुंढे आदींनी घटनास्थळी जावून पाहणी केली. मन्यारखेडा रस्त्यावर दोन्ही बालके कासावीस झाल्याचे दिसून आले. त्यांना लागलीच ताब्यात घेण्यात आले. सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी दोन्ही बालकांना खाऊ देत त्यांच्या डोक्यावर हात फिरवून शांत केले. दोघा बालकांना पोलिस स्टेशनला आणून बसवण्यात आले.  दरम्यानच्या कालावधीत दोघा बालकांचे पालक पोलिस स्टेशनला हजर झाले होते. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह रिजवान शेख यांच्या उपस्थितीत दोघा बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. बालक आणी पालक दोघांची भेट झाल्याने दोघांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here