नववधूचे अपहरण, पतीला मारहाण, घरातील वस्तूंची तोडफोड

जळगाव : प्रेम विवाह केल्याचा राग मनात ठेवून नववधूच्या माहेरच्या लोकांनी तिच्या सासरी येत तिच्या पतीसह त्याच्या आईवडीलांना, भावाला जबर मारहाण करत तिचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटने प्रकरणी सावदा पोलिस स्टेशनला प्रमुख पाच जणांसह इतर 30 ते 40 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

प्रफुल्ल रमेश पाटील (रा. सावखेडा बु. ता. रावेर) या तरुणाने एका तरुणीसोबत प्रेमविवाह केला. दोघांनी आपल्या मर्जीने जळगाव येथून बुरहानपूर येथे गेल्यानंतर तेथील स्थानिक न्यायालयात नोटरी पद्धतीने प्रेम विवाह केला. त्यानंतर बुरहानपुर येथीलच गायत्री संस्कार ट्रस्ट येथे नोंदणी पद्धतीने विवाह केला.

आपल्या मुलीने परस्पर प्रेम विवाह केल्याचा राग मनात ठेवून तिच्या माहेरकडील पाच नातेवाईकांसह इतर 30 ते 40 तरुणांनी 19 मे च्या दुपारी दिड वाजेच्या सुमारास तिचे सावखेडा बुद्रुक ता. रावेर येथील सासर गाठले. चारचाकी आणि दुचाकीने आलेल्या सर्वांनी मिळून विवाहीतेचा पती प्रफुल पाटील याच्यासह घरातील इतर सदस्यांना लोखंडी रॉडने मारहाण सुरु केली. प्रफुल पाटील याच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत या घटनेत तुटून नुकसान झाले. त्याच्या आजीला देखील लोखंडी रॉडने मारहाण झाल्याने ती जखमी झाली.

हा प्रकार झाल्यानंतर प्रफुल पाटील याच्या नवविवाहीत पत्नीला बळजबरीने चारचाकी वाहनात बसवून तिचे अपहरण करत जळगावच्या दिशेने पलायन केले. याप्रकरणी सावदा पोलिस स्टेशनला भाग 6 गु,.र.न. 109/23 भा.द.वि. 365, 143, 148, 149, 452, 324, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विनोद खांडबहाले करत आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here